राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता करोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा झपाट्याने संसर्ग होताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता ९ हजार ५६६ वर पोहचली आहे.

राज्यातील ९ हजार ५६६ करोनाबाधित पोलिसांमध्ये ९८८ अधिकारी व ८५७८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.सद्यस्थितीस २२४ अधिकारी व १७०५ कर्मचारी मिळून १ हजार ९२९ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर, ७५५ अधिकारी व ६७७९ कर्मचारी मिळून एकूण ७ हजार ५३४ पोलीस आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत १०३ पोलिसांचा मृत्यू झालेला असून, यामध्ये ९ अधिकारी व ९४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यात करोना लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या नियमांचे व सुचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयीपीसी कलम १८८ अन्वये २२ मार्चपासून तब्बल २ लाख १९ हजार ९७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, ८८३ आरोपींना पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.

जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरातही दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्येने आता १७ लाखांटा टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल ५४ हजार ७३६ नवे करोना पॉझिटिव्ह आढळले व ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १७ लाख ५० हजार ७२४ वर पोहचली आहे.

देशातील १७ लाख ५० हजार ७२४ करोनाबाधितांमध्ये सध्या ५ लाख ६७ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, ११ लाख ४५ हजार ६३० जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३७ हजार ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.