श्रीरंग बारणे, पार्थ पवार यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सोमवारी किरकोळ अपवाद वगळता सुरळीत पार पडली. शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यासह २१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी रायगड जिल्ह्यात उरण, पनवेल आणि कर्जत या विधानसभा मतदारसंघात मतदान झालं, सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या दोन तासांत मतदारसंघात ७ टक्के मतदान झाले, अकरा वाजेपर्यंत मतदान १७ टक्क्यांवर पोहोचले. दुपारी एक वाजता मतदानाचा टक्का ३० पर्यंत पोहोचला. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ४१.८६ टक्के मतदान झालं. पाच वाजेपर्यंत मतदानाचा आकडा ५२.७४ टक्क्यांपर्यंत पोहोचला. शेवटच्या एक तासात साधारण दहा टक्के मतदान अपेक्षित आहे. त्यामुळे मावळमध्ये साधारण ६० ते ६२ टक्के मतदान होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

मावळ, पिंपरी आणि चिंचवड या पुण्यातील मतदारसंघांच्या तुलनेत रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल आणि उरण या मतदारसंघात अधिक मतदानाची नोंद झाली. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.

कर्जत तालुक्यातील साळवड येथे ईव्हीएम मशीन बंद पडले. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया खंडित झाली, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बदलून मतदान पुढे सुरू केले. मतदानाच्या पाश्र्वभूमीवर तीनही विधानसभा मतदारसंघात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.   शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं.

२३ मेला मतमोजणी होणार आहे. २१ पकी कोणत्या उमेदवाराला मतदारांनी कौल दिला हे तेव्हाच स्पष्ट होईल.

३३ मावळ मतदारसंघात आत्तापर्यंत ( सायंकाळी ५ पर्यंत ) अंदाजे मतदान ५२.७४ %

पनवेल- ४९.३७ %

कर्जत-६१.२२ %

उरण -५९.६७ %

मावळ -५३.१९ %

चिंचवड -५०.९१ %

पिंपरी -४७.५७ %