मागील सलग ३ निवडणुकांत भाजपचा पराभव झालेल्या भोकरदन मतदारसंघात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पुत्र संतोष यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. युती तुटल्यामुळे संतोष दानवे यांना शिवसेना उमेदवाराने आव्हान उभे केले आहे.
२००३मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या चंद्रकांत दानवे यांनी सरळ लढतीत भाजपच्या शिवाजी थोटे यांचा पराभव केला. २००४ व २००९मध्येही चंद्रकांत दानवे यांनी भाजपला पराभूत केले. २००९मध्ये रावसाहेब दानवे यांची पत्नी भाजपच्या उमेदवार होत्या. अटीतटीच्या लढतीत चंद्रकांत दानवे केवळ १ हजार ६३९ मतांनी निवडून आले. मागील ५ वर्षांपासून रावसाहेब दानवे यांनी आपले पुत्र संतोष यांच्यासाठी या मतदारसंघातून पूर्वतयारी केली. संतोष हे रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. विविध माध्यमांतून त्यांना जनतेसमोर ठेवण्याचे काम भाजपने गेली ५ वर्षे केले.
भाजपचेच जुने कार्यकर्ते रमेश गव्हाड यांनीही भोकरदनमधून उमेदवारी मागितली होती. ऐनवेळी शिवसेनेने गव्हाड यांना उमेदवारी दिल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. गव्हाड यांचा तीन दशकांपासून मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह स्थानिक नेत्यांशी संपर्क आहे. मतदारसंघात संपूर्ण जाफराबाद तालुक्याचा समावेश असून, या भागातील कोणीही विधानसभेवर निवडून गेले नाही. या वेळी जाफराबादची ताकद गव्हाड यांच्या पाठीशी उभी राहण्याचे आवाहन त्यांचे समर्थक करीत आहेत.
रावसाहेब दानवे २ वेळा विधानसभा व ४ वेळा लोकसभेवर निवडून गेले. केंद्रात प्रथमच मंत्री झाल्याने त्यांचे महत्त्व वाढले. रामेश्वर कारखाना त्यांच्या अधिपत्याखाली असून शिक्षण क्षेत्रातही त्यांचे काम आहे. जि. प., पं. स., जिल्हा बँक आदी संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे दानवे निवडणुकीच्या राजकारणात वाकबगार मानले जातात. परंतु मागील सलग ३ निवडणुकांत भाजपचा उमेदवार त्यांना निवडून आणता आला नाही. आता भाजपमधीलच गव्हाड यांनी शिवसेनेकडून त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत दानवे व शिवसेनेचे गव्हाड दोघेही पूर्वाश्रमीचे भाजपचेच आहेत.
बदनापूरमध्येही चुरस
अनुसूचित जातीसाठी आरक्षित बदनापूर मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष सांबरे यांची भाजपचे नारायण कुचे यांच्यामुळे अडचण झाली आहे. या मतदारसंघात भोकरदन तालुक्यातील मोठा भाग येतो. या भागातील भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांनी महिनाभरापूर्वीच सांबरे यांच्याविरुद्ध जाहीर नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री दानवे यांचा प्रभाव या भागात आहे. एकीकडे भाजप व दुसरीकडे राष्ट्रवादीशी सांबरे यांना सामना करावा लागत आहे. मागील निवडणुकीत मनसेकडून उमेदवारी करून ३५ हजारांपेक्षा अधिक मते मिळविणारे बबलू चौधरी यांना या वेळी राष्ट्रवादीने मैदानात उतरविले आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची आणि औत्सुक्याची बनली आहे.