औरंगाबादची ओळख पर्यटनाची राजधानी अशी करून दिली जाते. जिल्हय़ातील ५ पर्यटन केंद्रांमध्ये देश-विदेशातून पर्यटक येतात. मात्र, एका पर्यटनस्थळी आलेली व्यक्ती दुसऱ्या पर्यटनस्थळापर्यंत जात नसल्याचेच दिसून येत आहे. वर्षांनुवर्षे बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, औरंगाबादची लेणी या ठिकाणी जाण्याचे पर्यटक टाळतात. अनेकांना औरंगाबाद लेणीची पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली जात नाही. पर्यटक मार्गदर्शकांच्या खासगी संस्थांमध्ये औरंगाबाद लेणी हे पर्यटनस्थळ केंद्रस्थानी नसल्याचेच दिसून येत आहे. पर्यटकांची ही गळती प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खिजगणतीतही नाही.
जागतिक पर्यटनस्थळ म्हणून वेरुळ व अजिंठय़ाच्या लेणीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी अजून पर्यटनाला तसा वेग आला नाही. मात्र, गेल्या वर्षी वेरुळला २८ हजार ८३२ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. त्यातून ७ कोटी २० लाख ८ हजार रुपये महसूल मिळाला. या वर्षी ९ हजार ७०५ विदेशी पर्यटकांनी वेरुळची लेणी पाहिली. यातील १ हजार ७१२ पर्यटक अजिंठय़ापर्यंत गेलेच नाहीत. २ हजार ४७१ विदेशी पर्यटकांनी बीबी का मकबऱ्याकडे पाठ फिरवली. दौलताबाद किल्ल्यावर त्यापेक्षा कमी जण गेले. नोव्हेंबरअखेपर्यंत औरंगाबाद लेणी पाहणाऱ्या पर्यटकांची संख्या केवळ ६१२ असल्याची आकडेवारी राज्य पुरातत्त्व विभागाकडे आहे.
विदेशी पर्यटकांकडून अजिंठा व वेरुळ या दोन पर्यटनस्थळी २५० रुपये प्रवेशशुल्क आकारले जाते. बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला व औरंगाबादची लेणी या पर्यटनस्थळांचे प्रवेशशुल्क १०० रुपये आहे. भारतीय पर्यटकांना ही सुविधा १० व ५ रुपये शुल्कात उपलब्ध आहे. विदेशी पर्यटकांकडून आकारले जाणारे शुल्क पर्यटक या व्याख्येमध्ये भेद निर्माण करणारे असल्याने विदेशी पर्यटकांचे शुल्क कमी करावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने नव्यानेच केंद्र सरकारला दिला आहे. पुरातत्त्व विभागात व पर्यटन महामंडळात अनेक बाबींवर मतभेद आहेत. ते अंमलबजावणीच्या पातळीवर कमी व्हावेत, यासाठी एक परिषदही घेण्यात येणार आहे, असे पर्यटन महामंडळातील सूत्रांनी सांगितले. मात्र, एका पर्यटनस्थळावरून दुसऱ्या पर्यटनस्थळी जाताना होणारी गळती चिंतेची बाब असल्याचे अधिकारी सांगतात खरे. मात्र, त्यावर उपाययोजना होत नाहीत.