आंबोलीत १२ महिने पर्यटक येतील असा पर्यटन विकास साधला जाईल. या ठिकाणी येणारा पर्यटक किमान दोन दिवस आंबोलीत थांबेल अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, असे पालकमंत्री नारायण राणे यांनी सांगून आंबोलीचा १५ किलोमीटर घाट रस्ता व दरडीचा सव्‍‌र्हे करून अहवाल सादर करण्याचे आदेश आपण दिल्याचे राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पालकमंत्री नारायण राणे यांनी आंबोली वर्षां पर्यटनस्थळी खास भेट दिली. भर पावसात त्यांनी दरडीची पाहणी करून आंबोली विश्रामगृहावर सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे यांनी घाटाची सविस्तर माहिती दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा बँक अध्यक्ष राजन तेली, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सेवादल जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, तालुका अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा सरचिटणीस संजू परब, मनोज नाईक, सरपंच बाळा पालेकर, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम पालेकर व मान्यवर उपस्थित होते.
आंबोली घाट, रस्त्याबाबत बांधकाम व वनखात्याकडून माहिती घेतल्यानंतर बोलताना पालकमंत्री नारायण राणे म्हणाले, आंबोली वर्षां पर्यटनास गर्दी होते. या ठिकाणी दरड कोसळणार नाही यासाठी बांधकाम खात्याने दक्षता घ्यावी म्हणून निर्देश दिले आहेत. ब्रिटिशकालीन घाटाच्या वरील गटारे काढण्यास वनखात्याने परवानगी द्यावी, असे सुचविल्याचे सांगितले.
आंबोलीच्या १५ किलोमीटर घाटात दरड कोसळू नये म्हणून सव्‍‌र्हे करावा, असे आपण सांगितले आहे. उंच डोंगरावरील दगड थेट रस्त्यावर येईल. त्यामुळे हा सव्‍‌र्हे करून कारवाई केली जाईल. या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे दरडीमुळे अपघात किंवा दुखापती होऊ नये अशी शासनाची भूमिका आहे, असे पालकमंत्री नारायण राणे म्हणाले. आंबोलीला पर्यायी रस्ता सुचविला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. वनखात्याची सहा किलोमीटरची परवानगी मिळताच पर्यायी रस्त्याचे काम सुरू होईल, असे पालकमंत्री नारायण राणे म्हणाले. आंबोलीचे पर्यटन बारमाही सुरू राहावे. किमान दोन दिवस पर्यटक थांबावा अशा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे पालकमंत्री राणे म्हणाले.
आंबोली पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगून दरड कोसळली तर अपघात होऊ नये म्हणून स्वित्र्झलडची जाळी आणली असून ती आठ मीटर खोल मजबूत बसविली जाणार आहे असे बांधकाम खात्याने सांगितले आहे, असे राणे म्हणाले.
आंबोली पर्यटनाचा विकास करताना वाहतूक, ड्रेसचेंज रूम, पार्किंग या सुविधांना प्राधान्य दिले जाईल. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले असून वनमंत्री पतंगराव कदम यांना आणून वनखात्याचा प्रश्न मार्गस्थ लावू, असे सांगताना सरपंचांनी भ्रष्टाचाराची तक्रार केल्यास चौकशी करू, असे ते म्हणाले.
पर्यटन विकासात ग्रामपंचायतींनी योगदान दिल्यास आंबोली, गेळे व चौकुळचा विकास होईल, असे सांगताना तिलारी प्रकल्पग्रस्त आपल्याकडे आले तर त्यांचा प्रश्न मार्गी लावू, असे राणे म्हणाले.