हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह्याातील पर्यटन व्यवसायाला पुन्हा एकदा निर्बंधांचे ग्रहण लागले आहे. डिसेंबर ते मार्च महिन्यात जोमाने सुरू असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा ओस पडला आहे, निर्बंधामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

करोनाच्या पहिल्या टप्प्यात देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे जवळपास सहा महिने रायगड जिल्ह्याातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद होता. सप्टेबरनंतर हळूहळू निर्बंध शिथिल होत गेले. तसा पर्यटकांचा ओघ पुन्हा एकदा वाढू लागला. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या पाच महिन्यांत पर्यटक मोठ्या संख्येनी जिल्ह्याात दाखल होत होते. त्यामुळे सहा महिन्यांच्या आर्थिक कोंडीतून पर्यटन व्यावसायिक सावरू लागले होते. शाळा- कॉलेज बंद असल्याने आणि अनेक खासगी आस्थापनांमध्ये घरातूनच काम करण्याची सुविधा देण्यात आल्याने पर्यटक सोमवार ते शुक्रवार या कालावधीतही पर्यटकांची हजेरी लागत होती. आठवड्याच्या अखेरीस तर अलिबाग, मुरुड, काशिद, नागाव, आक्षी, किहीम, मांडवा, आवास, दिवेआगर, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची हजारो पर्यटक दाखल होत होते. त्यामुळे हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट्स, रिसॉर्ट गजबजून जात होते.

समुद्रकिनाऱ्यांवर लहानसहान व्यवसाय करणारे व्यावसायिक, खाद्यपदार्थांची विक्री ठेलेधारक, जलक्रीडा व्यावसायिक, घोडागाडीचालक आणि एटीव्हीचालक यांचीही यामुळे चांगली कमाई होत होती. रोजगाराच्या संधी यातून उपलब्ध होत होत्या. मात्र मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्याात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा होण्यास सुरुवात झाली. करोनाचा वाढता आलेख लक्षात घेऊन राज्य सरकारने निर्बंध लागू केले. टप्प्याटप्प्याने ते अधिकच कडक होत गेले. त्यामुळे जिल्ह्याातील पर्यटकांचा ओघ आटत गेला. आज हॉटेल, लॉजेस रिसॉर्ट सुरू असले तरी पर्यटक येणे बंद झाले आहे. समुद्रकिनारे ओस पडले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला पुन्हा एकदा निर्बंधांचे ग्रहण लागले आहे. पर्यटन व्यावसायिक पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्याात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या दहा हजारांवर पोहोचली आहे. दररोज सरासरी २० जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळे पर्यटकही धास्तावले आहेत. अलिबाग, कर्जत, खालापूर, रोहा, माणगाव, पनवेल तालुक्यांतील रुग्णवाढ लक्षात घेता, पुढील काही दिवसांत निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांसमोरील अडचणी अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहे.

गेल्या वर्षी जवळपास सहा महिने व्यवसाय बंद होता. नंतरचे पाच महिने पर्यटकांचा ओघ वाढल्याने व्यवसायाला गती मिळत होती. झालेले आर्थिक नुकसान भरून निघण्याची आशा होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेने त्या आशेवर पाणी फिरवून टाकले आहे. बुकिंग बंद झाली आहेत. आमचे काही व्यावसायिक पण करोनामुळे बाधित झाले आहेत.

– निमेश परब, अध्यक्ष अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्था

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटकांचा ओघ आटला आहे. निर्बंधामुळे वीकेण्डलाही बुकिंग मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे पुन्हा व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आमच्यावर आली आहे.

– महेश सानप, संचालक, वाईल्डर वेस्ट अ‍ॅडव्हेंचर