सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात चांदा ते बांदा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारावी. या प्रकल्पाला दरवर्षी १०० कोटी मिळणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मरगळ झटकून काम करावे. अधिकाऱ्यांमध्ये शिथिलता आली आहे. त्यामुळे पुढील काळात कारवाई करण्यास भाग पाडू नका, असे सांगत पर्यटन व्हॅन सिंधुदुर्गात व विशेषत: आंबोलीत आणली जाईल आणि माजी सैनिकांना त्यात सवलत देण्याचा विचार राज्याचे गृह, अर्थ, नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

संजीवनी कृषी प्रदर्शनाला दीपक केसरकर यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, कृषी अधिकारी प्रमोद सावंत, नेरळचे चंदन भडसावळे, वेंगुर्ले सभापती यशवंत परब, दोडामार्गचे सभापती गणपत नाईक माजी आमदार पुष्पसेन सावंत आदी उपस्थित होते. चांदा ते बांदा योजनेच्या संजीवनी कृषी प्रदर्शनाला सोमवारी लाभार्थी शेतकरी व जिल्ह्य़ातील संबंधित अधिकारी उपस्थित राहायला हवेत, असे आवाहन केसरकर यांनी केले. आधुनिक यंत्रसामुग्रीद्वारे कृषी क्रांती घडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. भातशेतीची अद्ययावत यंत्रसामग्री गटांना दिली जाईल, असे सांगून जिल्ह्य़ात काजू लागवड मोठी करा, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात दुपटीने वाढ करून महिला कृषी गटांना शेतीची अद्ययावत अवजारे उपलब्ध करून दिली जातील. तसेच बागायतीत आंतरपीक घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. लोकांना जागरूक करण्यासाठी जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी शिथिलता झटकून कामाला लागावे, असे आवाहन केसरकर यांनी केले.