रत्नागिरी जिल्हा स्वच्छता मोहिमेंतर्गत सुप्रसिद्ध गणपतीपुळे परिसर आणि समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्याच्या उपक्रमात पर्यटकांनीही सहभागी होऊन स्वयंशिस्तीची गरज व्यक्त केली.
जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या पुढाकाराने गेल्या २५ डिसेंबरपासून रत्नागिरी शहर आणि जिल्ह्य़ात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्यामध्ये काल दिवसभर सुप्रसिद्ध गणपतीपुळे मंदिराच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. मंदिराच्या समोरील बाजूला किनाऱ्यापासून या मोहिमेची सुरुवात झाली. त्यानंतर मुख्य गणपती मंदिर आणि मालगुंड समुद्रकिनाऱ्याचीही स्वच्छता करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटक त्यामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी झाले. जेएसडब्ल्यू उद्योग समूहाने हे दोन्ही किनारे स्वच्छतेसाठी दत्तक घेतले आहेत. आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी जाधव, माजी जिल्हाधिकारी मधुसूदन साळवी, सरपंच रिमा बापट, मालगुंडच्या सरपंच साधना साळवी, गणपतीपुळे संस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. विवेक भिडे इत्यादी मान्यवरही या मोहिमेत सहभागी झाले. त्यापूर्वी मोहिमेची रूपरेषा स्पष्ट करून उत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या ख्यातनाम गणपतीपुळेचा परिसर कायम स्वच्छ ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जाधव यांनी केले.या परिसरातील व्यावसायिकांतर्फे दुष्काळग्रस्त निधीसाठी ११ हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.