रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर ३ मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत मनाई आदेश मंगळवारी जारी केले. करोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीला देण्यात आलेली मुदतवाढ लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान, खालापूर येथील इमॅजिका पार्क, कर्जत येथील एन.डी. स्टुडीओ, अलिबाग, मुरुड, मांडवा, काशिद, नागाव, किहीम, दिवेआगर, श्रीवर्धन येथील सागरी किनारेही पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत. रायगड, मुरुड जंजिरा, पद्मदुर्ग, कुलाबा, खांदेरी आणि उंदेरी यांच्यासह सर्व गडकिल्ल्यांवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व शैक्षणिक संस्था, खासगी शिकवण्या बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी बुधवारी काढले.

या पर्यटन स्थळांवर उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे या गर्दीच्या ठिकाणी करोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन साथ रोग प्रतिबंधक कायद्याअन्वये जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे आदेश जारी केले. आदेश मोडणाऱ्यांवर भा.द वी कलम १८८अन्वये कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.