सप्टेंबर महिन्यात आंतर राज्य प्रवासाची काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यानंतर जव्हार येथील पर्यटनस्थळी पर्यटकांचे पाय हळूहळू वळू लागले आहेत. टाळेबंदी व धबधब्यात जाण्याची बंदी घातल्यामुळे हौशी पर्यटकांचा हिरमोड झाला होता. धबधब्याच्या डोहात जवळ जाण्यास आजही बंदी असल्यामुळे डोहाजवळ न जाता  दुरूनच धबधब्याचा आनंद घेताना पर्यटकांचा कल दिसू लागला आहे.

जव्हार येथील दाभोसा या निसर्गरम्य आणि विलोभनीय धबधब्यामुळे ठाणे, मुंबई, नाशिक व गुजरातचे हजारो पर्यटक येथे आकृष्ट होताना दिसतात. या थंड हवेच्या परिसराला मीनी महाबळेश्वर म्हणून ओळख आहे. मात्र, पूर्वीच्या तुलनेत खूप मोठय़ा प्रमाणात जंगलतोड येथे झाली असल्याने त्याचा पर्यावरणावरही परिणाम झाला आहे.

पर्जन्यवृष्टीचे प्रमाण कमालीचे घटले आहे. सिमेंटच्या जंगलांचा विळखा शहराभोवती पडतो आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पूर्वीसारखा गारवा आज नाही. तरी देखील आसपासच्या तालुक्यांपेक्षा जव्हारचे हवामान आजही उन्हाळ्यात आल्हाददायक असते. तसेच, पर्जन्याचे प्रमाण कमी झाले असले तरी पावसाळ्यातले जव्हार आजही पर्यटकांना भुरळ पाडते यात तिळमात्र शंका नाही.

जमिनीपासून डोहाचे अंतर ५०० ते ६०० मीटर असून पाण्याजवळ गेल्यानंतर पाण्याचा अंदाज येत नाही. बंदी असल्याने नागरिकही खाली उतरत नाहीत तसेच महाराष्ट्रातील धबधब्यांची जी प्रसिद्ध ठिकाणे आहेत, त्यात दाभोसाचा क्रमांक नक्कीच वरचा राहील, याची खात्री आहे.

डोह सुमारे ७० ते ८० फूट खोल

जव्हार, तलासरी, सिल्वासा या मार्गावरील दाभोसा जव्हारहून साधारणत: २० कि.मी. अंतरावर आहे. तेथील लेंढी नदीवर दाभोसा-दादरकोपरा धबधबा आहे. धबधब्याचे डोह सुमारे ७० ते ८० फूट खोल आहे. धबधब्याचे पाणी ३०० फूट खोल एका डोहात पडत असते पावसाळ्याच्या हंगामात या ठिकाणी लांबून पर्यटक येत असतात. बऱ्यापैकी जंगल राहिले नसले, तरी पावसाळ्यातील हिरवीकंच वनश्री मन मोहून टाकते. पावसाळ्यातले  सौंदर्य वेगळेच. पण भर उन्हाळ्यात देखील दाभोसा तितकाच आकर्षित करीत असतो. पाण्याची धार कमी कमी होत जाते, पण पर्यटकांची गर्दी तितकीच असते.