भारतात येऊ घातलेल्या वॉलमार्ट-फ्लिपकार्ट या कंपनीच्या झंझावातापुढे किरकोळ दुकानदार उद्धवस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे . त्यामुळे हा करार रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने सोमवारी (२ जुलै )  रोजी कोल्हापूर  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे . या निर्णयाविरुध्द देशभरात निदर्शने करण्यात येणार  आहेत .

यामध्ये  कोल्हापूर डिस्ट्रीक्ट कंझ्युमर प्रॉडक्टस् डिस्ट्रीक्त असोशिएशन ,किरकोळ किराणा दुकानदार असोशिएशन व सर्व सहयोगी संघटनांच्या विक्रेते ,व्यापारी यांचा  सहभाग आहे , अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी व धैर्यशील पाटील यांनी शुक्रवारी दिली.

फ्लिपकार्ट ही ऑनलाईन व्यवसाय करणारी कंपनी नुकतीच  वॉलमार्ट या जागतिक बलाढ्य कंपनीने खरेदी केली आहे . हा व्यवहार म्हणजे केंद्र सरकारच्या परकीय गुंतवणुक धोरणांना बगल देऊन वॉलमार्टने आपल्या राक्षसी भांडवली ताकदीच्या जोरावर भारताच्या किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करण्याचा घाट घातला आहे. या करारामुळे भारतातील कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, किराणा यासह सर्वच क्षेत्रातील किरकोळ विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे.

देशातील ५ कोटींहून अधिक संख्येने असलेल्या किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय मोडीत निघणार आहे. या अनैसर्गिक करारामुळे कोट्यावधी लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असून, भारतीय उत्पादकांना फटका बसणार आहे. वॉलमार्ट तर्फे विदेशी कंपन्यांच्या मालाचा पुरवठा होणार असल्याने भारतीय उत्पादकांचेही कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी केली जाणार आहे, असे गांधी यांनी सांगितले.