विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना केवळ एकमेकांविरोधात लढायचे आहे असे नव्हे तर, काही जणांच्या विरोधात अन्य संघटनाही जोरकसपणे मैदानात उतरल्याचे दिसत आहे. ‘एलबीटी’ विरोधात लढा देणारी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम) ही संघटना त्यापैकीच एक. निवडणुकीची वेळ साधत या संघटनेने स्थानिक संस्था कर लादणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा ठराव मंगळवारी येथे आयोजित बैठकीत मंजूर केला. आचारसंहिता लागू होईपर्यंत आघाडी सरकारने एलबीटी हटविण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही. यामुळे संतप्त व्यापाऱ्यांची नस याच बैठकीत सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पकडत भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आमची सत्ता आल्यास स्थानिक संस्था कर हटविण्याचे आश्वासन दिले.
राज्यातील व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेच्यावतीने आयोजित व्यापारी मेळाव्यास राज्यातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. फॅमचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थानिक संस्था कर लागू करण्याच्या मुद्यावर बरीच चर्चा झाली.