अशोक तुपे

कांद्याचे उत्पादन यंदा जास्त असताना राज्यभरातील उपाहारगृहे बंद असल्याने मागणी घटून दर पडलेले आहेत. अशा वेळी कांद्याचे दर वाढवून आवक वाढेल अशा पद्धतीने कृत्रिम तेजी काही व्यापाऱ्यांनी के ली. यामागे कांद्याची साठवणूक करून पुढे मागणी वाढल्यावर चढय़ा दराने त्याची विक्री करण्याचा हा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे.

यंदा रब्बी व उन्हाळी हंगामात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले. त्यात करोनामुळे बाजार समित्याच्या आवारातील लिलाव बंद  होते. तसेच आठवडे बाजार तसेच राज्यातील उपाहारगृहे बंद आहेत. त्यामुळे कांद्याला मागणी नव्हती. निर्यात ठप्प झाली होती. निर्यातीला परवानगी दिली तरी जगभर मागणी कमी होती. दरही कमी होते. बांगलादेश व दुबईला कांदा जात आहे. पण मागील वर्षीच्या तुलनेत निर्यात कमी आहे. पुरवठा जास्त व मागणी कमी यामुळे कांद्याच्या दरात मोठी मंदी आली. मागणी व पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त असल्याने दर कोसळले.

कांदा जानेवारी महिन्यापासून ते जूनपर्यंत भाव आठशे ते रुपयांपर्यंत होते. कांदा काढणीच्या वेळी पाऊस झाला होता. हा कांदा चाळीमध्ये सडू लागला तसेच मेच्या अखेरीला पाऊस सुरू झाला. त्याने कांदा सडू लागला. पाऊस सतत चालू असल्याने कांद्याला मोड फुटू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने कमी दर मिळत असूनही बाजारात कांदा विकावा लागला. मात्र या महिन्यापासून दरात सुधारणा झाली. आता कांद्याचे दर एक हजार ते सोळाशे रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. कांदा दरात फारशी तेजी आलेले नाही. पण कांदा मंदीच्या गर्तेतून बाहेर पडला आहे. अद्याप तेजीकडे वाटचाल झालेली नाही. पण २०१८ साली जशी कृत्रिम तेजी तयार करण्यात आली होती. तसाच प्रयत्न सुरू आहे.

गेल्या आठवडय़ात मनमाड, राहाता, श्रीरामपूर, घोडेगाव, नगर, पुणे आदी बाजार समित्यांच्या आवारात कांद्याला क्विंटलला २२०० ते २६०० रुपये दर देण्यात आला. दहा ते वीस गोण्यांना हा दर दिला गेला. कृत्रिम तेजी ही पाचशे ते सहाशे रुपये वाढीवर जाऊन पोहचली. दक्षिणेकडचा कांदा सडला, मध्य प्रदेशातील चाळीत कांदा राहिला नाही.

आता राज्यात चाळीत असलेला कांदा सडला असल्याने तो विकून टाकला गेला. आता फारच कमी कांदा चाळीत शिल्लक आहे, अशा अफवा मोठय़ा प्रमाणावर पसरविण्यात आल्या. एकूणच दरवाढीचे हे कारण देण्यात आले. कांद्याच्या या तेजीने बाजार समित्यांचे नाव झाले. काही व्यापारी जास्त दर देतात म्हणून त्यांचे नाव समाजमाध्यमातून झळकले. अचानक आलेल्या तेजीने बाजार समित्या, व्यापारी व शेतकरी पुरते गोधळून गेले. त्याचा अर्थ हा प्रत्येकजण स्वत:च्या सोयीने लावू लागला. पण हा फुगा दोनच दिवसांत फुटला आहे. ही कृत्रिम तेजी जाणीवपूर्वक काही लोकांनी निर्माण केली होती.

मागील आठवडय़ात स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, पोळा आदी सुटय़ा होत्या. तसेच राज्यभर सर्वत्र पाऊस कोसळत होता. त्यामुळे कांद्याची बाजार समितीच्या आवारात आवक कमी झाली होती. ही आवक वाढविण्यासाठी काही बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे. तर कांद्याची पळवापळवी हा व्यापाऱ्यातील खेळ नेहमी सुरू असतो. मोठय़ा व्यापाऱ्यांना शह देण्यासाठीदेखील तसेच व्यापारातील असूयेपोटी हा उद्योग काहीजण करतात.

व्यापाऱ्यांवर कारवाई नाही?

राज्यात सुमारे वीस ते बावीस हजार कोटींची कांदा व्यापारातील उलाढाल आहे. अर्थकारणातून नेहमी बाजारात असे प्रकार केले जातात. पण अशा व्यापाऱ्यांवर बाजार  समित्या करवाई करत नाही. कारण बाजार समित्यांना दोनशे कोटींहून अधिक रुपये सेसच्या माध्यमातून मिळत असतात. त्यामुळे आपल्या बाजार समितीच्या आवारात कांदा जादा विक्रीसाठी यावा म्हणूनही व्यापाऱ्यांना हाताशी धरून कृत्रिम तेजीचा खेळ खेळला जातो, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

कांदा व्यापारी सुरेश बाफना यांनी सांगितले की, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतील खरीप कांदा पावसामुळे शेतात सडला आहे. जुना चाळीतील कांदा खराब होत आहे. त्याला मोड येत आहेत. तो सडत आहे, पण एवढी मोठी तेजी नाही. कृत्रिम तेजी काही लोकांनी तयार केली आहे. भाव कितीही कमी-जास्त झाले तरी आवक भरपूर आहे. सध्या तेजी नाही. मंदीतून कांदा बाहेर पडला, पण तेजी नाही. भाव सुधारले आहे. आहे ती कृत्रिम तेजी आहे, असे ते म्हणाले.

कांदा व्यापारी सुदाम तागड म्हणाले, राज्यात सर्वात मोठी आवक ही घोडेगाव बाजारात होते. दिवसाला चाळीस हजार गोण्या कांदा विक्रीसाठी येतो. भाव हे सरासरी बाराशे ते पंधराशे एवढे आहेत. सोळाशे ते सतराशे दर हा अपवादात्मक मालाला मिळतो, पण अठराशे ते चोवीसशे हा दर मात्र कृत्रिम तेजीचा आहे. त्याला अर्थ नाही. प्रसिद्धीचा खटाटोप त्यामागे आहे. या दराने सर्व माल ते का खरेदी करत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

अन्य राज्यांत पावसामुळे कांदा ३० टक्के खराब झाला, पण लागवड अधिक आहे. राज्यात चाळीत कांदा भरपूर शिल्लक आहे. पण माल खराब होत आहे. निर्यात सुरू आहे. पण तेजी मात्र निसर्गावर अवलंबून आहे. परतीच्या पावसावर पुढील तेजीचे गणित अवलंबून आहे. तेजी- मंदी जुगार आहे. पण दोन ते तीन महिन्यांनंतर काय गणित असेल हे निसर्ग ठरवील. आताची तेजी कृत्रिम आहे, असे ते म्हणाले. जानेवारीनंतर भाव खूप कमी झाले. त्यात शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघाला नाही. तोटा झाला. आता कांदा मंदीतून बाहेर पडला, पण तेजी नाही. कृत्रिम तेजी तयार केली जात असली तरी ती खरी नाही, पण त्याने कांदा व्यापार अस्थिर होतो, हे थांबले पाहिजे, असे मत तागड यांनी व्यक्त केले.

बाजारात ज्यावेळी मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक असतो, त्यावेळी वरच्या पातळ्यांवर पुरवठय़ाचा दबाव वाढतो. परिणामी, दर कमी होतात. बाजारभाव किफायती राहण्यासाठी संतुलित पुरवठा असणे गरजेचे असते. शिल्लक मालातील कमाल घट आणि लवकर लागवड केलेल्या खरीप कांद्याचे पाऊसमानामुळे होणारे संभाव्य नुकसान गृहीत धरूनही नोव्हेंबरअखेपर्यंत पुरवठय़ाची स्थिती पुरेशी राहणार असे दिसते.

-दीपक चव्हाण, शेतमाल विक्रीचे अभ्यासक, पुणे