एलबीटी हटविण्यासंदर्भात राज्य शासनाला ६ जूनपर्यंत मुदत देण्यात आली असून आज सांगलीत झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात एलबीटी हटविला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापा-यांच्या मेळाव्याच्या पार्श्र्वभूमीवर सोमवारी सांगली बंद पाळून व्यापा-यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सोमवारी सकाळी एलबीटीच्या विरोधात राज्यातील व्यापा-यांची भूमिका निश्चित करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. फामचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात २३ महापलिका क्षेत्रातील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी कृती समितीचे निमंत्रक विराज कोकणे यांनी अन्यायी एलबीटी कराबाबत व्यापा-यांची भूमिका विशद केली.
या वेळी बोलताना खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले की, एलबीटीमुळे व्यापारी वर्ग भरडून निघत आहे. हा अन्यायी कर राज्य शासनाने मागे घेतला नाही, तर प्रश्न आणखी चिघळेल. फामचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आदेश देऊनही राज्य शासन या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाही. प्रशासनातील सचिवांचाच एलबीटी हटविण्यास विरोध आहे. राज्य शासनाने ५ जूनपर्यंत एलबीटी हटवून त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही, तर ६ जूनपासून राज्य व्यापारी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. कृती समितीचे निमंत्रक विरोज कोकणे यांनी एककर प्रणालीची अंमलबजावणी करावी अशी मागणी या वेळी केली.
दरम्यान, एलबीटी हटाव मागणीसाठी सांगली महापालिका क्षेत्रात व्यापा-यांनी बंद पाळून आपल्या भावना टोकाच्या असल्याचे दर्शविले. सांगलीतील कापडपेठ, गणपती पेठ, हरभट रोड, जुना स्टेशन रोड या ठिकाणी असणारी व्यापारी दुकाने, मेगा मॉल, उपाहारगृहे बंद होती. या शिवाय मिरजेतील तांदूळ मार्केट, सोमवारपेठ आदी ठिकाणीची दुकाने आज दिवसभर बंद होती. वसंतदादा मार्केट यार्डमधील सर्व व्यापारी आस्थापने आज बंद ठेवण्यात आली. त्यामुळे कोटय़ावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.