विद्रोह हा कायम प्रेमानेच करावा लागतो. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही त्याच मार्गाने गेले. आपल्या परंपरेतच विद्रोहाची क्षमता असल्याचे मत प्रसिद्ध साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक गिरीश कर्नाड यांच्या हस्ते डॉ. नेमाडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. नेमाडे यांनी कादंबरीला आता कंटाळलो असल्याचे सांगत कवितांकडे वळण्याची प्रकर्षांने इच्छा असल्याचे नमूद केले.
येथील महाकवी कालिदास कलामंदिरात बुधवारी आयोजित या सोहळ्यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष जब्बार पटेल, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, प्रतिभा नेमाडे उपस्थित होते. एक लाख रूपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मनोगत व्यक्त करताना नेमाडे यांनी पुरस्कारासाठी आपली एकमताने निवड झाल्याचे ऐकल्यावर आश्चर्याचा धक्का बसल्याचे सांगितले. आपण इतके स्वीकाहार्य झालो आहोत काय, असा प्रश्नही पडला. ‘कोसला’ कादंबरी प्रसिद्ध होवून इतका कालावधी लोटला तरी आजवर एकही पारितोषिक मिळाले नाही. तेव्हा डॉ. नेमाडेंना तसे काही मिळू नये, असे एकमताने निश्चित होत असे, म्हटले जायचे. या पुरस्कारासाठी एकमताने निवड झाल्यामुळे मराठी अभिरूचीत बदल होत आहे, हे लक्षात आले. राज्यात वाचन संस्कृती मराठवाडय़ात अतिशय विस्तृत असून त्या खालोखाल सांगली व कोल्हापुरचा क्रमांक आहे. या प्रक्रियेत मुंबई व पुणे खूप पिछाडीवर असल्याचेही त्यांनी नमूद केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानने राबविलेला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रम वाचन संस्कृती वाढविण्यासाठी महत्वपूर्ण असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जी शिक्षा दिली जाते, तीच शिक्षा स्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्यांनाही दिली गेली पाहिजे, असेही डॉ. नेमाडे यांनी ठामपणे सांगितले. गिरीश कर्नाड यांनी डॉ. नेमाडे यांनी हिंदुत्वाचे योग्य व परखडपणे विश्लेषण केल्याचे सांगितले. त्यांच्या एकूणच साहित्याने आपण प्रभावित झालो असल्याचेही मत त्यांनी मांडले.