02 March 2021

News Flash

…अशी करतात घटस्थापना

नवरात्रोत्सव करा आनंदी

प्रातिनिधिक छायाचित्र

नवरात्र म्हटले की देवीची आराधना आणि व्रतांची आठवण होते. दरवर्षी येणारा नवरात्रीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी त्याविषयी किमान माहिती असायला हवी. यंदा २१ सप्टेंबर रोजी गुरुवारी आश्विन शुल्क पक्ष प्रतिपदेला घटांची स्थापना होणार आहे. यावर्षीचा मुहूर्त, देवीचे व्रत कसे करावे याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या नऊ रात्री देवीपुढे अखंड दीप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रांची पारायणं केली जातात. महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी येतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात आणि आपले जीवन सुरळीत व्हावे यासाठी वरदान मागतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.

शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत. नवरात्रात अनेक कुटुंबांमध्येही व्रत केले जाते. यामध्ये कुलाचाराने देवीची पूजा केली जाते. अनेक घरांत कुलाचार असतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्‍तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीप प्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.

नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्‍त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा आहारात समावेश करावा. देवीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. अनेक जण ९ दिवस उपवास करतात त्यांनीही आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी ‘नऊ’ या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.) कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती व भजन करून देवीचे चिंतन करावे

 

घट बसवताना…

१. नवरात्रमहोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील माती आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (पाच किंवा) सप्तधान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे इ.

२. मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात.

३. सप्तधान्ये आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी.

४. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रोत्सव साजरा करावा.

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत

१. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

२. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

३. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली अध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.

४. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

५. देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 8:30 am

Web Title: tradition of navratra mahotshav how to pray goddess
Next Stories
1 विद्यापीठ नामांतर वादामागे भाजपमधील सत्तासंघर्ष
2 कृषी कर्जमाफीची डोकेदुखी
3 भाजप प्रवेशाचा मुहूर्त लांबल्याने राणेंची समांतर काँग्रेस?
Just Now!
X