शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर, रविवारी शहरातील मध्यवर्ती भागातून मिरवणूक निघणार असल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारी १२ ते मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. या मार्गावरून जाऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलीस शाखेने केले आहे.
मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी म्हटले आहे. शिवजयंतीची मिरवणूक वाकडीबारव येथून सुरू होते. जहांगीर मशीद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, अब्दुल हमीद चौक, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, रेडक्रॉस, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशुराम पुरीया रस्त्याने रामकुंडापर्यंत असा मिरवणूक मार्ग आहे. दुपारी १२ वाजेपासून मिरवणुकीचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. या दिवशी उपरोक्त कालावधीत निमाणी बसस्थानक आणि पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसेस पंचवटी डेपोतून सुटतील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील. पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल, कन्नमवार पुलावरून जातील. याबाबतची माहिती डहाणे यांनी दिली.