मुंबई-गोवा आणि मुंबई-नाशिक मार्गावर वाहतूक कोलमडली
उन्हाळ्याच्या सुटीसाठी कोकणकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने शनिवारी सकाळपासून मुंबई -गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यातच द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांच्या हालात भर पडली. मुंबई-नाशिक महामार्गावरही गॅसचा टँकर उलटल्याने वाहतूक पुरती कोलमडली.
मुंबई -ठाणे परिसरातून कोकणात निघालेल्या प्रवाशांना शनिवारी प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. मुंबई- गोवा महामार्गावर रायगड हद्दीत एकाच वेळी तीन ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पेणजवळील खारपाडा पूल, वाकण फाटा आणि कोलाड नाका या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहनांची प्रमाणाबाहेर वाढलेली संख्या, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहनचालक, अपुरा पोलीस बंदोबस्त आणि किरकोळ अपघात ही जुनीच कारणे या वाहतूक कोंडीसही कारणीभूत ठरल्याचे दिसून आले. वडखळ नाका, रामवाडी परिसर आणि माणगाव बाजारपेठ या पट्टय़ातील वाहतूक संथ गतीने सुरू ठेवण्यात पोलिसांना यश आले मात्र खारपाडा, सुकेळी िखड ते कोलाड पट्टय़ात वाहतूक नियंत्रित ठेवण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरले.
खारपाडा ते कोलाड हे अंतर पार करण्यासाठी चार ते पाच तास लागत होते. त्यामुळे प्रवासी चांगेलच वैतागले होते.
वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मुंबईकडून येणारी वाहने वाकण फाटा येथून भिसे िखडीतून रोहामाग्रे वळविण्यात आली, तर कोकणातून येणारी वाहने रोहामाग्रे नागोठण्याकडे वळविण्यात आली. त्यामुळे दुपारनंतर वाहतूक पूर्वपदावर येण्यास मदत झाली.

लोणावळ्याजवळ अपघातात ठाण्याच्या दोघांचा मृत्यू
* लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी तवेरा गाडी चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या खाली जाऊन एका झाडाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. लोणावळय़ाजवळील सिंहगड कॉलेजजवळ हा अपघात झाला.
* या अपघातामध्ये गाडीचा चालक सुरेश भाऊ तारमळे (वय २७, रा. शेरे, शहापूर, जि. ठाणे) आणि प्रवासी कमल दगडू पाटोळे (वय ५०, रा. उल्हासनगर, शहापूर, जि. ठाणे) हे दोघे मृत्युमुखी पडले असून, राहुल दत्तू ननावरे (वय २२, रा. टिटवाळा, जि. ठाणे) आणि भूषण संदीप पाटोळे (वय १५, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) हे दोघे जखमी झाले आहेत.
* मुंबईच्या दिशेने ही गाडी भरधाव वेगाने जात होती. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानंतर ती रस्ता सोडून रस्त्याखाली गेली. रस्त्याच्या कडेचे एक झाड मुळापासून तोडून सुमारे १५० फूट अंतरावर ही गाडी द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षा जाळीत अडकली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले. लोणावळा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना उपचारासाठी निगडी येथे दाखल केले आणि मृतदेह खंडाळा येथे शवविच्छेदनासाठी पाठवले.

संथ रुंदीकरण
रायगड जिल्ह्य़ातील पळस्पे ते इंदापूरदरम्यान मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू आहे. हे काम अतिशय संथ गतीने होत आहे. २०११ मध्ये सुरू झालेले रुंदीकरण २०१४ अखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र नवे सरकार येऊन दोन वर्षे उलटूनही ५० टक्के कामदेखील पूर्ण झालेले नाही. रुंदीकरणासाठी ठिकठिकाणी वळण रस्ते काढण्यात आले आहेत. यामुळे वाहतुकीचा वेग आणि अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

* घोटी : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसने भरलेल्या टँकरला अपघात झाला. त्यात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. कसारा घाटालगत लतीफवाडी ते चिंतामणवाडी दरम्यान मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या इंडेन कंपनीच्या गॅसने भरलेला टँकर एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गावरच उलटला. यामुळे मुंबईहून नाशिककडे येणारी वाहतूक ठप्प झाली. टँकर चालक फरार झाला.