गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या सुखकर व सुरळीत प्रवासासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने केलेले सर्व नियोजन बुधवारी कोलमडल्याचे दिसून आले. मुंबई गोवा महामार्गावर कोलाड ते माणगावदरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे लाखो चाकरमानी अडकून पडले होते. तीस किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सहा ते सात लागत होते.
चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले होते. मुंबई गोवा महामार्गावर रायगड हद्दीत १२ ठिकाणी २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, याशिवाय ४ ठिकाणी विशेष पोलीस मदत केंद्र स्थापना करण्यात आली होती. महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, १ पोलीस निरीक्षक, १८ पोलीस अधिकारी आणि १८२ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याशिवाय महामार्गावरील ३० ठिकाणांवर ८८ कर्मचारी २४ तास तैनात ठेवण्यात आले होते. तर ४४ कर्मचाऱ्याना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी फिरते राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र पोलीसांचे हे नियोजन बुधवारी सकाळीच फोल ठरल्याचे दिसून आले.
मुंबई, ठाणेमधून कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. मुंबई गोवा महामार्गावर कोलाड ते इंदापुर आणि इंदापुर ते मागणगाव पट्ट्यात सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांची प्रमाणाबाहेर वाढलेली संख्या, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहन चालक, अपुरा पोलीस बंदोबस्त आणि किरकोळ अपघात या वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरल्याचे दिसून आले. वडखळ नाका, रामवाडी परिसर आणि खोपोली बायपास या पट्ट्यातील वाहतूक नियंत्रित ठेवण्यात पोलीसांना यश आले असले तरी सुकेळी खिंड ते मागणाव या पट्ट्यात वाहतूक नियंत्रित ठेवण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरले. काही वाहन चालकांचा आतताईपणाही या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरला. महामार्गाची दुरवस्था आणि रुंदीकरणाच्या कामामुळे अरुंद झालेले रस्ते यांनी वाहतूक कोंडीत अधिकच भर घातली.