लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कोकणाकडे निघालेल्या गणेशभक्तांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.  मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि त्यातच सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वडपाले गावाजवळ एक एसटी बस जळून खाक झाली. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावला असून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

मुबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याकडील मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला असून सकाळपासूनच अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कासवगतीने सुरू आहे. रविवार असल्याने आज दिवसभर आणि उद्या सुट्टी असल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर अशीच परिस्थिती राहील असे द्रुतगती मार्गावरील वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.  दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचे हाल झाले आहेत. पेण ते ईरवाडी पर्यंत वाहनांच्या रांगा आहेत, तर वाकण ते कोलाड आणि इंदापूर ते माणगावपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.

यापूर्वी, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ वडपाले येथे एसटी बस जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत 57 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला. यावेळी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. ही बस गणेश भक्तांना घेऊन मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे चालली होती. या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती, सध्या वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठी असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्याही तितकीच मोठी आहे, त्यातच धिम्या गतीने वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.