20 November 2019

News Flash

मुंबई-गोवा महामार्गाला वाहतूक कोंडीचे ग्रहण

मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला २०११ मध्ये सुरुवात झाली होती.

अरुंद रस्ता, बेशिस्त वाहन चालक, महामार्गावर ठीकठिकाणी सुरू असलेली चौपदरीकरणाची कामे आणि अवजड वाहनांची संख्या यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. अनेक प्रयत्न करूनही वाहतूक कोंडीची समस्या सुटत नसल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला २०११ मध्ये सुरुवात झाली होती. २०१९चा जून महिना उजाडला तरी हे काम अद्याप पूर्ण झालेला नाही. गेल्या वर्षभरापासून पळस्पे ते वडखळ कामाला गती मिळाली असली तरी काही ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रामुख्याने तरणखोप ते वडखळ या पट्टय़ात जवळपास दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पेन रेल्वे स्थानक, तारा, जीते, वडखळ या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या अधिकच भेडसावत आहे.

महामार्गावर वाढलेली अवजड वाहनांची संख्या या वाहतूक कोंडीत भर घालत आहे. अरुंद रस्त्यावर एखादा ट्रक बंद पडल्यास, वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. महामार्गावर ठीकठिकाणी बाह्यवळण रस्ते देण्यात आले आहेत, मात्र या ठिकाणी बाह्यवळण सूचना देणारे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. बऱ्याचदा चुकीच्या दिशेने वाहने चालवली जातात. यामुळे अपघाताची शक्यता असते.

वडखळ येथे बायपास उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. या मार्गावर अलिबागकडे जाणारी वाहतूक सातत्याने वळवली जात आहे. रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. पुलाची कामेही अपूर्ण आहेत. पुलांच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सळ्या धोकादायकपणे बाहेर ठेवण्यात आल्यात. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी वडखळ बायपास मार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

वाहतूक कोंडीला वाहनचालकांचा बेशिस्तपणा हादेखील कारणीभूत ठरतो. वाहने चालवताना लेनची शिस्त पाळली जात नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होते. पोलिसांनाही वाहतूक नियमन करणे कठीण होऊन बसते.

महामार्गावर दोन्ही बाजूला बसणारे फेरीवाले, भाजी विक्रेते यांच्यामुळेही वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वडखळ ते हमरापूर या पट्टय़ात भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. पांढरे कांदे, कंदमुळे, फळे आणि भाज्या या ठिकाणी विकल्या जात आहेत. येणारे-जाणारे वाहनचालक या ठिकाणी वाहने थांबवतात. त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होते. महामार्ग प्राधिकरणाने, तसेच वाहतूक पोलिसांनी यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

‘दर शनिवार-रविवार या मार्गावर वाहतूक समस्या उद्भवते.  त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी बऱ्याचदा एक तासाचा कालावधी लागतो. अवजड वाहने त्यात अधिकच भर घालतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निवारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.’     –  डॉ. सचिन पाटील, प्रवासी

वाहतूक कोंडी का होते?

१. अवजड वाहनांची वाढलेली संख्या

२.  बेशिस्त वाहनचालक

३. अरुंद रस्ते, लेनची शिस्त न पाळणे

४. रस्त्याच्या दुतर्फा बसणारे भाजी विक्रेते

५. महामार्गाचे रखडलेले काम

 

उपाययोजना गरजेच्या

१. धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे

२. लेनची शिस्त पाळणे

३. अवजड वाहतूक नियंत्रित करणे

४. रस्त्याचे काम लवकर मार्गी लावणे

५. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे

First Published on May 19, 2019 12:26 am

Web Title: traffic jam on mumbai pune expressway 5
Just Now!
X