|| नीरज राऊत

प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी नाही; शहरातील बहुतेक रस्त्यांवर संथगती

पालघर : पालघर शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा आणि बैठकांचेच आयोजन केले जात असल्याने त्यामधून ठोस उपाययोजना कार्यरत होत नसल्याचे दिसून आले आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध बैठकांमध्ये अनेक उपाययोजना आणि निर्णय घेण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढतच असून शहरातील सर्वच रस्ते कोंडीमय झाले आहेत.

पालघर शहरात रेल्वे स्थानकाच्या बाहेरच्या भागात, नगरपरिषद कार्यालयाच्या समोर, जुना पालघर, हुतात्मा स्तंभ, हॉटेल जगदंबा नाका, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी दररोज वाहतूक कोंेडी होत असते. नोकरदार वर्गाच्या गाडय़ा पकडण्याच्या वेळेत आणि शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी येथे वाहतूक कोंडी होत असते. रस्त्याकिनारी बसणारे हॉकर, वाहनांची अवैद्य पार्किंग, तीन आसनी रिक्षांचे अवैध वाहनतळ, वाहनचालकांचा बेशिस्तपणा, अवजड वाहनांची वाहतूक तसेच अनेक ठिकाणी होणारे अतिक्रमण यामागील प्रमुख कारण आहेत.

१८ सप्टेंबर १९९८ रोजी पालघर नगरपरिषद स्थापना झाली. त्यानंतर १९९९पासून वाहतूक कोंडी विषयांवर पोलीस, उपविभागीय अधिकारी, पालघर नगरपरिषद तसेच जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून दर चार ते सहा महिन्यांनी वाहतूक कोंडी समस्यांवर बैठकांचे आयोजन करण्यात येत असून त्या बैठकीला नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन मंडळ, व्यापारी, रिक्षा चालक-मालक संघांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांचा सहभाग असतो. अशा बैठकांमध्ये अनेकदा चर्चा होऊन वेगवेगळे उपाय सुचवण्यात आले. तसेच त्याविषयी पालघर नगरपरिषदेने अनेक ठराव घेतले आहेत. मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हा काही दिवसांचा दिखावाच असल्याचे दिसून आले आहे.

सध्या रिक्षांना सहज परवाना मिळत असल्याने तीन आसनी रिक्षांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. अशा रिक्षांना वाहतूक खेळती ठेवण्यासाठी अनेक वर्षांपासून सुचवण्यात आलेली शेअर रिक्षाप्रणाली अजूनही पालघरमध्ये कार्यरत नाही. याखेरीज सहा आसनी रिक्षांना टप्पा वाहतुकीची परवानगी नसताना त्यांच्याकडून होणारी प्रवाशांची वाहतूक याबद्दल आक्षेप नोंदवला जात आहे. रस्त्याकडेला पार्किंग करणारी वाहने आणि दुचाकी तसेच ना-फेरीवाला क्षेत्रामध्ये बसणारे विक्रेते व फेरीवाले हेही डोकेदुखीचे कारण ठरत आहे. या सर्वाविषयी वेगवेगळे उपायोजना करून दिल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी कोणी करावी हा प्रश्न पालघरच्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे.

वाहतूक कोंडी नियोजनासाठी घेतलेले निर्णय

  • पालघर शहरात एक दिशा मार्ग करण्याचा निर्णय १९९९मध्ये प्रथम घेण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर पुन्हा २००५-०६मध्ये चर्चा झाली आणि शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र त्याची आजवर यशस्वी अंमलबजावणी झाली नाही.
  • पालघर शहरातील रस्त्याकडेला वाहने पार्किंग करताना पी-१ व पी-२  प्रणाली अंमलबजावणी करण्याचा निर्णय २०१३-१४ मध्ये घेण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी विविध कारणास्तव झाली नाही.
  • अवजड वाहनांच्या पालघर शहरातील प्रवेशाबाबत अनेकदा निर्णय घेतला घेण्यात आला. दुपारी साडे बारा ते सायंकाळी चार यादरम्यान अवजड वाहतुकीला परवानगी असताना दिवसभर अशी वाहने शहरात मुक्तपणे वावरताना दिसतात.
  • रिक्षा वाहनतळावर निवडक रिक्षांचे पार्किंग करण्याचे नियम अनेकदा तयार करण्यात आले. मात्र अंमलबजावणी होत नाही. पालघरमध्ये ना-फेरीवाला क्षेत्राची नगर परिषदेने घोषणा केली असली तरीसुद्धा तिथे फेरीवाले बसत असल्याचे दिसून आले आहे.

वाहतूककोंडीसंदर्भात पालघर नगर परिषदेमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठवडय़ात बैठकीचे आयोजन केले आहे. -डॉ. उज्ज्वला काळे, नगराध्यक्ष, पालघर