नाताळाची सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांमुळे द्रुतगती मार्ग आणि मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक कोलमडली. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
सलग चार दिवस सुट्टय़ा आल्याने मुंबई व पुणेकर मौजमजा करण्यास बाहेर पडले असून शुक्रवारी सकाळपासून मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, जुना महामार्ग पेण-खोपोली मार्ग, पाली मार्ग यावर कमालीचे ट्रॅफिक झाले असून अक्षरश: चक्का जाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ट्रॅफिक पोलीस कमालीची मेहनत घेत असून खोपोलीजवळून जाणारा द्रुतगती महामार्ग बोरघाटात धिम्या गतीने पर्यटकांच्या गाडय़ा पुढे सरकत असल्याने अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला.
ईद, नाताळ व सलग लागून आलेला शनिवार, रविवार या चार दिवस सुट्टय़ा आल्याने मुंबई व पुणेकर मोठय़ा प्रमाणावर मौजमजा करण्यास बाहेर पडले असून, शुक्रवार सकाळपासून मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, जुना महामार्ग पेण- खोपोली मार्ग, पाली मार्ग यावर कमालीची ट्रॅफिक झाली आहे. खालापुरात अडलब इम्याजिका हे जागतिक दर्जाचे थीमपार्क व वॉटरपार्क झाल्यापासून येथे जगभरातून रोज हजारो प्रवासी येत असतात आणि अशी सुट्टी आल्यावर मुंबई पुण्याच्या नागरिकांना तर पर्वणीच. ही सुट्टी साजरी करण्यास शुक्रवारी हजारो पर्यटक बाहेर पडल्याचे दिसले. मुंबईतील पर्यटक खंडाळा या थंड हवेच्या ठिकाणी मौजमजा करण्यास व घाटमाथ्याखाली खोपोलीत असणाऱ्या इम्याजिका येथे येतात आणि शुक्रवारी तर कहरच झाला. सकाळपासून मुंबई-पुण्याकडून दोन्ही बाजूने हजारो पर्यटक बाहेर पडलेले दिसले. त्यामुळे ट्रॅफिकवर विपरीत परिणाम झाला. राष्ट्रीय महामार्ग जुना, द्रुतगती महामार्ग व या दोन्ही महामार्गाला मिळणारे पेण व पाली हे दोन्ही मार्ग पर्यटकांच्या गाडय़ांच्या गर्दीने चक्का जाम झालेले दिसले. ट्रॅफिक पोलीस जोमाने कामाला लागले होते. कोठेही अपघात होणार नाही याची काळजी घेत ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी नियोजन करीत होते.
सकाळी ९ वाजल्यापासून खालापूर टोल नाक्यावर ५ किलोमीटर रांगा लागलेल्या दिसत होत्या, तर बोरघाटातही दोन्ही लेनवर पर्यटकांच्या गाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या. एरव्ही १० मिनिटांत पार होणारा बोरघाट पार करण्यास दोन ते तीन तास लागत होते. या सुट्टय़ांमुळे हे ट्रॅफिक वाढले असून, दुपारनंतर वाहतूक पूर्ववत होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात होता.