कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे गेल्या चार दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग सोमवारी खुला झाला. मार्ग सुरू असला तरी पहिल्यांदा अत्यावश्यक वाहनांना सोडले जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. महापुराने पुणे बेंगळूरु महामार्ग व्यापून टाकला होता. शुक्रवारी सायंकाळी महामार्गावर काही ठिकाणी सहा फूट पाण्याची पातळी झाल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता. आज झपाटय़ाने पाणी ओसरल्यावर सकाळी  तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

सध्या या मार्गावरून अत्यावश्यक वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे. यामध्ये दूध, पाणी, ऑक्सिजन, इंधन अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहने प्रामुख्याने सोडण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. महामार्गावर दीड फूट पाणी आहे. ते उतरल्यानंतर चारचाकी दुचाकी वाहने सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महामार्ग सुरू झाला तरी अवजड वाहनांना प्राधान्य आहे.

पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत जाहीर

सांगली:  राज्यातील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तातडीने दहा हजार रुपये रोखीने आणि पाच हजार धान्य स्वरूपात तातडीची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी सांगलीत केली.महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या वडेट्टीवार यांनी सांगितले की, महापुराने जिल्हयातील ४१ हजार कुटुंबातील १ लाख ९७ हजार लोक विस्थापित झाले.

मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द

वाई :  साताऱ्यातील अतिवृष्टी आणि दरड दुर्घटनांमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र कोयनानगरला पावसाचा जोर वाढल्याने हेलिकॉप्टर उतरविण्यास हवामान अनुकूल नसल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला.  चार दिवसांत जिल्ह्य़ात  दरड कोसळणे, घराचे छत पडून व पुरात वाहून गेल्यामुळे ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.