सोलापूर : शहरात ठिकठिकाणी ‘नो पाìकग’मध्ये लावलेली वाहने उचलण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा भाडोत्री क्रेनच्या साह्याने कारवाई करीत असते. परंतु मंगळवारी या क्रेनवरील वाहतूक शाखेचे पोलीस आणि त्यावरील कर्मचा-यांनी संतापजनक प्रकार करून सोलापूर पोलिसांची मान खाली घातली. दुचाकी वाहन तर उचललेच परंतु वाहनधारक आणि त्याच्या शाळेला निघालेल्या छोट्या मुलीलाही चक्क क्रेनवर बसवून घेऊन गेल्याची संतापजनक घटना घडली.

शहरातील पूर्व भागात राहणारे अंबादास मेरगू हे आपल्या दुचाकीवरून मुलीला शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. वाटेत त्यांनी छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रूग्णालयाच्या आवारात असलेल्या लक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्याचे ठरविले आणि गाडी मंदिराच्या बाजूला लावून ते मुलीसह दर्शनाला गेले. तेव्हा काही क्षणांतच एमएच २५पी ७४७५ या क्रमांकाचे वाहतूक शाखेचे क्रेन तेथे आले . क्रेनवरील कर्मचा-यांनी अनेकांच्या गाड्या उचलल्या. आपलीही दुचाकी उचलण्यात आल्याचे मेरगू यांच्या लक्षात येताच त्यांनी वाहतूक शाखेचे पोलीस आणि कर्मचाऱ्यांना, मला माझ्या मुलीला शाळेत सोडायला जायचे आहे. खूप उशीर होऊ लागला आहे.

मला माझी गाडी द्या, अशी विनंती केली. परंतु पोलिस व त्या कर्मचाऱ्यांनी मेरगू यांचे कसलेच ऐकले नाही उलट यांना व त्यांच्या गणवेश व पाठीवर दप्तर घेतलेल्या छोट्या मुलीला क्रेनवर बसविले आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात नेऊन त्यांच्याकडून २५० रुपये दंड वसूल केला.

दरम्यान, क्रेन रस्त्यावरून पुढे जात असताना आणि त्यावर गणवेशातील मुलगी उभी असलेली पाहून पोलिसांच्या असंवेदनशीलबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला. काही जणांनी क्रेनवर बसलेली ती मुलगी व तिचे पालक यांचे छायाचित्र काढून समाज माध्यमातून प्रसारित केले.

दरम्यान, प्रहार संघटनेने संबंधित वाहतूक शाखेचे पोलीस व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून वाहनधारकांची पिळवणूक करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांविरोधात येत्या शनिवारी, ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक शाखेमार्फत शहरातील विविध ठिकाणांहून जी वाहने उचलली जातात, त्यासाठी क्रेन भाड्याने घेतली असून त्यावर काम करणारे कर्मचारीसुद्धा दमदाटी आणि उद्धटपणा करून दररोजचा महसूल वसुलीचा इष्टांक पूर्ण करण्यासाठी सर्रास वाहने उचलतात . मुळातच शहरात वाहन तळांची व्यवस्था तोकडी आहे. आश्चर्य म्हणजे एखाद्या रस्त्यावर विशिष्ट बाजूचीच वाहने उचलली जातात. दुसऱ्या बाजूला बेशिस्तीने लावलेल्या वाहनांना धक्काही लावत नाहीत.