कुर्डूवाडी-दौंडच्या दरम्यान जिंती रोड स्टेशनवर सोमवारी पहाटे यशवंतपूर-जयपूर एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा पडून चोरटय़ांनी प्रवाशांना मारहाण करीत लाखोंचा ऐवज लुटून नेला. चोरटय़ांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंगही केल्याचेही सांगण्यात आले. तर इकडे माढा तालुक्यातही चोरटय़ांनी धुमाकूळ घालून दरोडा घातल्याचे दिसून आले.
कुर्डूवाडी-दौडच्या दरम्यान जिंती रेल्वेस्थानक प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक म्हणून ओळखले जाते. यापूर्वी या भागात अनेक वेळा रेल्वेप्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. सोमवारी पहाटे यशवंतपूर-जयपूर एक्स्प्रेस सोलापूरहून रवाना होत कुडूवाडीमार्गे मार्गस्थ होताना दौंडच्या अलीकडेजिंती रोड रेल्वेस्थानकात काही वेळ थांबवण्यात आली. परंतु १० ते १५ सशस्त्र चोरटय़ांनी रेल्वेगाडीत घुसून प्रवाशांना चाकू, तलवारी आदी शस्त्रांचा धाक दाखवत रोख रक्कम, सोन्याचे दागिने, बॅगा लुटण्यास प्रारंभ केला. जाता जाता चोरटय़ांनी महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन केले. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंगही केला.
सुमारे १५ मिनिटे हा प्रकार घडत असताना रेल्वेगाडीत प्रवाशांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे सुरक्षारक्षकांनीही दक्षता घेतली नव्हती. यातच प्रवाशांची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी गाडी रोखून धरली होती. अखेर पीडित प्रवाशांची तक्रार नोंदविली गेली.
दरम्यान, कुर्डूवाडीजवळ माढा तालुक्यात ठिकठिकाणी सशस्त्र चोरटय़ांनी धुमाकूळ घालून लाखोंचा ऐवज लुटून नेला. माढा शहर व परिसरासह उपळाई ठोंगे, बेंद आदी भागात सशस्त्र दरोडे पडले. यात माढा येथील कदमवस्तीवर दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून प्रकाश कदम, त्यांच्या पत्नी सुलभा कदम व मुलांना मारहाण करून दहशत निर्माण केली. घरातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम असा मिळून ८५ हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. तर साठे गल्लीत अविनाश जयसिंह साठे यांच्या घरातील व्यक्तींना शस्त्रांचा धाक दाखवून चोरटय़ांनी रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने लुटून नेले. या वेळी साठे यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. उपळाई बुद्रुक येथे संतोष अण्णाराव वागज यांच्या घराकडे दरोडेखोरांनी मोर्चा वळवून लूटमार केली. नंतर बेंदवस्तीवर विजयसिंह साठे यांच्या घरावरही दरोडा पडला.