मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शोध व बचाव पथकात सहभागी स्वयंसेवक मुलामुलींना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने महाकाळी धरणावर प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण देतांना करोनाच्या संदर्भातील सर्व सुरक्षा विषयक नियमाचं पालनही करण्यात आलं.
दरम्यान, पूरस्थितीत बचाव कार्य करण्याबाबत यावेळी मार्गदर्शनही करण्यात आलं. आपत्ती निवारणात स्वयंसेवकांची भूमिका आणि जबाबदारी सांगतांनाच स्वत:चेही जीवन सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घेण्याबाबत उपाय सांगण्यात आले. या प्रशिक्षणात बचाव साहित्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्याबाबत नागपूरचे पोलीस निरिक्षक ललित मिश्रा व उपनिरिक्षक राधेलाल मडावी यांनी ५० स्वयंसेवक मुलामुलींना तसेच अशासकीय संस्थेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (नागपूर) यांच्यातर्फे या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं.
कोणत्याही आपत्तीत घाबरून न जाता संकटाचे स्वरूप समजून घेण्याचा सल्ला आपत्ती व्यवस्थापक किशोर सोनटक्के यांनी दिला. जिल्ह्यातील विविध नद्यांना पावसाळ्यात पूर येतो. त्यामुळे असंख्य गावं बाधित होतात. नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांना इतरत्र हलविण्याचे काम बोटीच्या माध्यमातून केले जाते. याचवेळी स्वयंसेवकाची कसोटी लागत असल्याचे प्रशिक्षणातून प्रामुख्याने सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 8:04 pm