अशोक तुपे

पारनेरच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्याचे राज्य पातळीवर पडसाद उमटले. राज्याच्या सत्तेत एकत्र असताना राष्ट्रवादीने शिवसेनेचे नगरसेवक फोडले अशी टीका सुरू झाली असली तरी या पक्ष प्रवेशामागे स्थानिक संदर्भ वेगळे आहेत.

पारनेर नगरपंचायतीची मुदत संपत असून तीन महिन्यानंतर निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी नगरपंचायतीच्या डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधारे, वैशाली औटी, नंदा देशमाने या पाच नगरसेवकांसह शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख उमा बोरुडे, उद्योजक सहदेव तड्ढहाळ, शैलेश औटी  आदींनी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे पाचही नगरसेवक शिवसेनेचे माजी आमदार व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष  विजय औटी यांचे समर्थक आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे नेतृत्व स्विकारले आहे.

खरेतर या पक्षप्रवेशाला स्थानिक राजकीय संदर्भ आहेत. औटी व लंके यांच्या राजकीय वर्चस्वाचे डावपेच त्यामागे आहेत. मात्र आता ‘वडय़ाचे तेल वांग्यावर‘ या पद्धतीने पक्षप्रवेशाचा विषय महाआघाडीच्या दोन्ही घटक पक्षात तापविण्याचा प्रयत्न सुरू झाला.  महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच नगरच्या राजकारणात झालेली ही फोडाफोड आहे. फोडाफोडीचा फटका प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाच बसला आहे.

नगरच्या राजकारणात साखर सम्राट व प्रस्थापितांचा नेहमीच प्रभाव राहिला. पण अनेकदा विस्थापितांचेही राजकारण उदयाला आले. आमदार निलेश लंके हे त्यापैकीच एक. कोणी त्यांना राष्ट्रवादीतील आर.आर.पाटील तर कोणी बच्चू कडूची उपमा देतात. तीन हजार लोकवस्तीच्या हंगा (ता.पारनेर) या गावातही त्यांचे कुटुंब प्रस्थापित नाही. एका निवृत्त शिक्षकाचे ते चिरंजीव. जिरायत शेती. वडील एक किराणा दुकान चालवतात. अशा एका सामान्य कुटुंबातून लंके हे पुढे आले.

पारनेर-सुपा रस्त्यावर ते एका पत्र्याच्या शेडमध्ये लहान हॉटेल चालवत असत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे  हे  दहा पंधरा वर्षांपूर्वी पारनेरला येत असतांना त्यांनी त्यांची गाडी अडविली. शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन केले. हॉटेलवरच शाखेचा फलक लावला. सेनाप्रमुखांचा कट्टर शिवसैनिक अशीच त्यांची ओळख राहिली. ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, अशी अनेक पदे त्यांनी शिवसेनेतच मिळविली. सध्या त्यांच्या पत्नी राणी लंके या जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या सदस्या आहेत. २००४ ला ते पारनेर तालुका प्रमुख झाले. त्यांच्याकडे तरुणांचा संच मोठा आहे. पारनेरला खरी शिवसेना सबाजी गायकवाड व लंके यांनीच रुजविली. पण २०१९ मध्ये माजी आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसाला सेनेचे कार्याध्यक्ष व आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आले तेव्हा लंके यांनी शक्तीप्रदर्शन केले. ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर लंके यांना जबाबदार धरुन त्यांना पक्षातून काढण्यात आले. लोकसभेपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शिवसेनेचे पाच नगरसेवक हे काही निष्ठावंत शिवसैनिक नव्हते. पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत औटींनी उमेदवारी दिल्याने ते शिवसैनिक झाले. आता लंके यांच्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बनतील. नगरचे दिग्गज राजकारणी हे नेहमीच वाऱ्याची  दिशा पाहून पक्ष बदलतात. कार्यकर्ते तर त्यात दोन पावले पुढेच असतात.  नगरला शिवसेनेचा प्रभाव हा राहिलेला नाही. राष्ट्रवादी मात्र बळकट झाली आहे. भाजपातही भांडणे वाढली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला नगरच्या राजकारणात मोकळे रान मिळाले. पारनेरच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा नव्याने पायाभरणीला सुरुवात केली.

वरिष्ठच बोलतील-औटी

शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर व मंत्री सुभाष देसाई यांनाच शिवसेना नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाबद्दल प्रतिक्रिया विचारा. तेच उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया माजी आमदार विजय औटी यांनी व्यक्त केली. राज्यात एकत्रित काम करत असतांना कार्यकर्ते फोडायची वृत्ती चांगली नाही. प्रत्येक पक्षाचे संकेत असतात. शिवसेनेत शिस्त आहे. त्यामुळे वरिष्ठ नेतेच बोलतील, असे औटी यांचे म्हणणे आहे.