लोकेश चंद्रा ‘सिडको’त, भूषण गगरानी मुख्यमंत्री कार्यालयात

राज्याच्या प्रशासन प्रमुख- मुख्य सचिवपदी दिनेशकुमार जैन यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रशासनात बदल्यांची लाट आली असून बुधवारी २७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसात आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निघणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांनी सांगितले. वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी यु.पी. एस मदान यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्याचे दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील आयुक्त लोकेश चंद्रा यांची ‘सिडको’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी, भूषण गगरानी यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून तर आर.ए. राजीव यांची ‘एमएमआरडीए’च्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

येत्या दीड वर्षांत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना राज्यातील विविध विकासकामे पूर्णत्वास नेण्याबरोबरच लोकांची कामेही मार्गी लागावीत आणि एकूणच निवडणुकीसाठी ‘फील गुड’ वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनात फेरबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यानी घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सेवाज्येष्ठता डावलून डी. के. जैन यांना मुख्य सचिवपदी बसविण्यात आले आहे. जैन यांनी प्रदीर्घ काळ दिल्लीत काम केले असून राज्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळेच मेधा गाडगीळ आणि सुधीर श्रीवास्तव यांची सेवाज्येष्ठता डावलून मुख्यमंत्र्यानी जैन यांना पसंती दिल्याचे सांगितले जाते. मुख्य सचिवपदाचा तिढा सुटल्यानंतर आता प्रशासनातही मोठय़ा प्रमाणात खांदेपालट करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात २७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून येत्या आठवडाभरात आणकी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात  दररोज शेकडो लोक आपले प्रश्न घेऊन येत असतात. मात्र त्यांच्या समस्या एकूण घेऊन त्यांचे समाधान करण्यासाठी सध्या कोणीच उपलब्ध नसते. ही समस्या दूर करण्याची जबाबदारी गगरानी यांच्यावर सोपविण्यात येणार असल्याचे बोलले जाते. सिडकोत नियुक्ती झालेले लोकेश चंद्रा बऱ्याच वर्षांपासून दिल्लीत महाराष्ट्र सदनात राज्याचे आयुक्त म्हणून कार्यरत असून मध्यंतरी निकृष्ठ जेवणावरून शिवसेना खासदारांनी लोकशचंद्र यांच्या विरोधात आंदोलनही केले होते. पराग जैन यांची महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून तर राजीव मित्तल यांची वित्त विभागात प्रधान सचिव(व्यय) येथे बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी पी. वेलारासू, सुमंत भांगे यांची मत्स्य विकास महामंडळात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, विजय  वाघमारे यांची राज्य परिवहन महामंडळात सह व्यवस्थापकीय संचालकपदी, डी.एस. कुशवाहा यांची मुंबई गृहनिर्माण महामंडळाच्या मुख्याधिकारीपदी, बी.जी .पवार यांची जालना जिल्हाधिरी म्हणून, डी.के. जगदाळे यांची मुंबई इमारत दुरूस्ती महामंडळाच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. सुनिल चव्हाण यांची  रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून, संजय यादव यांची ठाणे अप्पर आदिवासी आयुक्त, शंतनू गोयल यांची परभणी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नाराज मेधा गाडगीळ रजेवर

मुख्य सचिपदी नियुक्तीमध्ये सेवाज्येष्ठता डावलण्यात आल्याने नाराज झालेल्या मदत व पुनर्वसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ आणि गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव रजेववर गेले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावून श्रीवास्तव यांची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गाडगीळ मात्र महिनाभर रजेवर गेल्या असून श्रीवास्तव एक आठवडय़ासाठी रजेवर गेल्याचे समजते.