शहराच्या कडबी मंडीतील जीवनरेखा बालगृहामधील गैरव्यवहाराची दखल घेत जिल्हा बालकल्याण समितीने १३ अनाथ मुलांना लातूरच्या सेवालय या अनाथालयात हलविण्याचा निर्णय घेतला. उद्या (मंगळवारी) वैद्यकीय तपासणीनंतर या मुलांची सेवालयात रवानगी होईल.
नारी विकास मंडळ संचालित जीवनरेखा बालगृहात एचआयव्ही बाधीत १३ मुलांचे संगोपन केले जात होते. परंतु संस्थाचालक जावेद फारुखी याच्याकडून बालगृहाच्या नावाखाली गरव्यवहार केला जात असल्याने या बाबत डॉ. पवन चांडक यांनी महिला बालकल्याण समिती, बालहक्क आयुक्त (पुणे), राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांकडे तक्रारी केल्या. परंतु संस्थाचालकावर कुठलीही कारवाई होत नसल्याने डॉ. चांडक यांनी माहिती अधिकारातून या बालगृहाच्या गरव्यवहाराची माहिती उघडकीस आणली.
एकही कर्मचारी नसताना त्यांच्या नावावर वेतन उचलले जात असल्याचा प्रकार समोर आला. या बरोबरच बालकांच्या नावाने येणाऱ्या अन्नधान्यासह निधी बालकांपर्यंत पोहोचवला जात नव्हता. डॉ. चांडक यांनी वेळो-वेळी बालगृहाला दिलेल्या वस्तू व उपकरणांचा लाभ बालकांना होत नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून या बालकांची उपासमार सुरू होती. त्यामुळे या बालकांना लातूरच्या सेवालयात हलविण्याची मागणी डॉ. चांडक यांनी केली होती. जिल्हा बालकल्याण समितीने जावेद फारुखी यास नोटिसा देऊनही संस्थेच्या कारभारात कोणताही बदल झाला नसल्याने, तसेच सद्यस्थिती पाहता या बालकांना लातूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या या मुलांची वैद्यकीय तपासणी करून लातूरच्या सेवालयात रवानगी करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. ओस्तवाल यांनी दिली.
जीवनरेखा बालगृहातील मुलांना दिलेल्या वस्तू व उपकरणेही मुलांसोबत लातूरला पाठवाव्यात. संस्थेच्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. चांडक यांनी केली.