ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरलाच लक्ष्यकेल्याने वन्यजीवतज्ज्ञांना आश्चर्य

राज्यातील विविध प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनात एकवाक्यता यावी आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाशी समन्वय साधता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरण स्थापन करण्यात आले. मात्र, प्राधिकरणाने उद्देशालाच हरताळ फासत अधिकार क्षेत्राबाहेर काम करण्यास सुरुवात केली आहे. प्राधिकरणाच्या कार्याची मर्यादा प्राणिसंग्रहालयाशी निगडित आहे. मात्र, शहरातील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ वन्यप्राण्यांच्या उपचार आणि उपचारानंतर वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यासाठी असताना, या केंद्राला प्राधिकरणाने ‘लक्ष्य’ केल्याने ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने शहरातील महाराजबाग प्राणिसंग्रहालयावर सुरुवातीपासून टीकेची झोड उठवली आहे. या प्राणिसंग्रहालयात प्राधिकरणाच्या नियमांचे अनेक ठिकाणी उल्लंघन करण्यात आले आहे. या प्राणिसंग्रहालयात हरीण, बिबट अतिरिक्त संख्येत आहे. पिंजऱ्यांची अवस्था आजही खराब आहे. अनेक पिंजऱ्यांना गंज चढलेला आहे. या ठिकाणच्या प्राण्यांची वैद्यकीय तपासणी नियमित केली जात नाही. त्याचा अहवाल ठेवला जात नाही. यावरून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने यात सुधारणा न झाल्यास पुढील परवानगी नाकारण्याचा इशारा व्यवस्थापनाला दिला. त्यामुळे या सुधारणा झालेल्या आहेत किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची असताना अधिकाऱ्यांनी याठिकाणी ढुंकून पाहण्याचीसुद्धा तसदी घेतली नाही. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय तयार होत असले तरीही याठिकाणीसुद्धा पिंजऱ्यांची रचना चुकीची तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, येथेही महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या चमुने जाऊन पाहण्याची तसदी घेतली नाही. मात्र, वनखात्याचे तत्कालीन प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या प्रयत्नांमुळे पूर्णत्वास आलेल्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ला प्राधिकरणाने सध्या लक्ष्य केले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने त्यांच्या अधिकारक्षेत्रात हे केंद्र येत नसल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. तरीही त्यांच्या नियमानुसार पिंजऱ्यांची रचना आणि संपूर्ण केंद्राच्या इमारतीची रचना तयार करण्यात आली. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनीही इतर विभागाला या केंद्राला भेटी देऊन याच धर्तीवर इतर ठिकाणी केंद्र तयार करण्यासंदर्भात पत्र लिहिले. मात्र, महाराष्ट्र प्राणिसंग्रहालयाने शहरातील दोन प्राणिसंग्रहालय सोडून अधिकाराच्या कक्षेत नसलेल्या या केंद्रावर वक्रदृष्टी फिरवल्याने यामागे नेमकी कुणाची फूस तर नाही ना, अशीही शंका आता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सहाय्यक वनसंरक्षक मिसाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी वारंवार बंद दाखवण्यात येत होता.

राज्यातील अनेक प्राणिसंग्रहालयात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. केंद्रीय स्तरावरील प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशांचे पालन होत आहे किंवा नाही हे पाहण्याऐवजी ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ मागील महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या वक्रदृष्टीचे कारण कळायला मार्ग नाही. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी राज्याच्या प्राधिकरणाला केवळ हे केंद्र पाहण्यासाठी पाठवले होते, पण प्राधिकरणाचे अधिकारी चक्क या केंद्रात ढवळाढवळ करीत आहे. मुळातच  हे केंद्र प्राणिसंग्रहालयाच्या व्याख्येत येत नाही. कारण या ठिकाणी प्राण्यांवर उपचार केले जातात आणि नंतर नैसर्गिक अधिवासात ते सोडले जातात. अशावेळी प्राधिकरणाची ही कारवाई कुठल्या सुडबुद्धीने तर नाही ना, अशी शंका यायला लागली आहे.  कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक व ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ

महाराष्ट्र प्राणिसंग्रहालयाच्या स्थापनेमागील उद्देश

  • केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्देशान्वये शासकीय प्राणिसंग्रहालयात विकास आराखडय़ाप्रमाणे कामे कार्यान्वित करणे.
  • राज्यात महापालिका व खासगी संस्थांकडून निर्मिती करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त प्राणिसंग्रहालयाचे नियंत्रण, नियमन.
  • संकटग्रस्त प्राण्यांचे संवर्धन व प्रजनन.
  • वन्यप्राणी आरोग्य व व्यवहारासंबंधी संशोधन कार्यक्रम इतर संस्था, प्रयोगशाळेच्या समन्वयाने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे.
  • जनतेत वन्यप्राण्यांबाबत आवड निर्माण करण्याकरिता जनजागृती करणे.