मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी अपघातांच्या सत्रांमुळे मंदावली होती. पहिल्या घटनेत कल्याणजवळ वीजेचा मनोरा कोसळून दोन जणांचा तर दुस-या घटनेत सटाण्याजवळ इनोव्हा गाडीच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी सकाळी महामार्गावर कल्याणजवळ आसनगाव – वाशिंद दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणा-या कंटनेर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटनेरने रस्त्यालगतच्या वीजेच्या मनो-याला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की मनोरा कोसळला आणि त्यामध्ये कंटनेरमधील दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुंबईकडे येणा-या वाहनांची वाहतूक दुपारपर्यंत ठप्प पडली होती. वीजेचा टॉवर हा महावितरणचा असल्याची माहिती समोर येत आहे.

दुस-या घटनेत नाशिकजवळ वाहिवर्डे गावावजवळ इनोव्हा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होते. इनोव्हा गाडीतील प्रवासी सटाण्याहून कल्याणला जाण्यासाठी निघाले होते. मात्र लागोपाठ झालेल्या दोन अपघातांमुळे महामार्गावरील असुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.