पारनेर : राज्य प्राथमिक शिक्षक परिषदप्रणीत गुरूमाऊली मंडळाने साडेतीन वर्षे शिक्षक बँकेत पारदर्शक कारभार केला. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक परिषदेकडून राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जातो. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये शिक्षक परिषदेविषयी विश्वास निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले यांनी केले.

शिक्षक बँकेच्या होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या तोंडावर विविध शिक्षक संघटनांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सदिच्छा मंडळाचे पारनेर तालुकाध्यक्ष संतोष खामकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सदिच्छा मंडळाला राम राम ठोकत शिक्षक परिषद व गुरूमाऊली मंडळात प्रवेश केला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात रोहोकले बोलत होते. शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, पदवीधर परिषदेचे जिल्हाध्यक्ष भिवसेन पवार, विकास मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब ढोकरे,गणेश वाघ, बाबुराव कदम उपस्थित होते.

रोहोकले म्हणाले की, जिल्ह्यतील विरोधी संघटनांच्या अंतर्गत गटबाजीतून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमुळे ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांची प्रतिमा डागाळली होती. शिक्षक बँकेत पारदर्शी कारभार करुन शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाने शिक्षकांच्या प्रतिमा संवर्धनाचे काम केले असल्याचा दावा रोहोकले यांनी केला.

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी  राज्य शिक्षक परिषद सातत्याने पाठपुरावा करत आहे. शिक्षक बँकेत पारदर्शी कारभार करणे व शिक्षकांच्या समस्यांबाबत  न्याय देण्याचे सामथ्र्य शिक्षक परिषदेत असल्याने आपण शिक्षक परिषदेत प्रवेश करत असल्याचे संतोष खामकर यांनी सांगितले. खामकर यांच्यासह बाळासाहेब ठाणगे, विजय वाळुंज, संदीप रोकडे, सुदाम साळुंके, सुनील रोकडे, संतोष नरसाळे यांनी शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळात प्रवेश केला.

गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखरे यांनी शिक्षक बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने गेल्या दीड वर्षांत केलेल्या गैरव्यवहाराची माहिती दिली. सूत्रसंचालन बाबासाहेब धरम यांनी केले.‘गुरुमाऊली’चे कार्याध्यक्ष दत्तात्रय गवळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब रोहोकले त सुनील दुधाडे, रवींद्र पायमोडे, प्रताप खिलारी, संदीप झावरे, संदीप सुंबे, शिवाजी कोरडे,अशोक गाडगे, संतोष चेमटे, महिला आघाडी अध्यक्षा स्वाती झावरे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

गेल्या दोन वर्षांत शिक्षक परिषदेचे काम,ध्येयधोरणे जिल्ह्यतील वाडय़ा वस्त्यांवरील शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केल्यामुळे शिक्षकांमध्ये शिक्षक परिषदेबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षकांचे  प्रश्न शिक्षक परिषदेच्या माध्यमातून मार्गी लागू शकतात याची खात्री पटल्याने शिक्षक परिषद व रोहोकलेप्रणीत गुरूमाऊली मंडळाकडे शिक्षकांचा कल वाढता आहे. शिक्षक परिषदेमध्ये मोठय़ा संख्येने शिक्षक प्रवेश करीत आहेत. विविध शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी प्रवेशासाठी संपर्कात आहेत. आमच्यात सहभागी झालेल्या सर्वांचा,कोणताही भेदभाव न करता सन्मान केला जाईल.

प्रविण ठुबे, जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद.