जिल्ह्यात ६० रिक्त जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. भरतीची ही प्रक्रिया पारदर्शकच असेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस दलात सुमारे ६० रिक्त जागांच्या भरतीमध्ये खुल्या वर्गासाठी १६, अनुसूचित जातीसाठी १०, अनुसूचित जमातीसाठी ७, विमुक्त जाती अ.साठी ५, भटक्या जमाती ब.साठी १, भटक्या जमाती क.साठी ३, ड. साठी १, विशेष मागास प्रवर्गासाठी १ तर इतर मागासवर्गीयांसाठी १६ जागा असे आरक्षण असल्याचे सुधीर दाभाडे म्हणाले. ५ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरावेत, २५ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत आवेदनपत्र स्वीकारले जाणार आहेत. स्टेट बँकेत पसे भरण्याचा शेवटचा दिवस २६ मे राहणार आहे. भरतीची प्रक्रिया सुरू होणार असली तरी प्रत्यक्ष पोलीस भरतीची तारीख अजून कळलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
या भरतीप्रक्रियेचे आदेश प्राप्त होताच संत नामदेव पोलीस कवायत मदानावर भरतीप्रक्रिया सुरू करण्यात येईल. दरम्यान, मदानावर उमेदवार व नेमलेल्या अधिकाऱ्यांची उपस्थिती असेल. इतरांना मदानावर प्रवेश दिला जाणार नाही, तसेच नातेवाइकांच्या वशिल्यासाठी पोलीस कर्मचारी मदानावर आढळून आल्यास त्याच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.