News Flash

“७२ तासांच्या आत माफी मागा अन्यथा…”; परिवहन मंत्री अनिल परब यांचा सोमय्यांवर मानहानीचा दावा

परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे.

kirit-somaiya-on-anil-parab-resort

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांचा घोटाळा बाहेर काढण्याची मालिका सुरु केली आहे. भ्रष्टाचारासंदर्भात सातत्याने आरोप केले जात आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. परिवहन विभागातील बदली, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनिल परब यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना तब्बल १०० कोटीच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे. नोटीसीत ७२ तासाच्या आत सर्व ट्विट डिलीट करण्याचा तसेच बिनशर्त माफी मागण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोमय्या यांच्या सततच्या बेछुट आरोपांमुळे अनिल परब यांची प्रतिमा मलिन होत असल्याचं देखील नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. अनिल परब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नते आणि मंत्री आहेत. मेहनत करून त्यांनी समाजात प्रतिष्ठा मिळवली आहे. मात्र किरीट सोमय्या यांच्या निराधार आरोपांमुळे प्रतिमा डागाळत असल्याचा उल्लेख नोटीशीत करण्यात आला आहे. तसेच नोटीशीत काही ट्वीटचा तारखेसह उल्लेख करण्यात आला आहे. आता भाजपा नेते किरीट सोमय्या या नोटीशीला काय उत्तर देतात?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोमय्या यांनी काय आरोप केले आहेत?

अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. “अनिल परब यांच्यावर ताबडतोब फसवणूक करण्यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून २०२०मध्ये तीनमजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. अनिल परब यांनी १९ जून २०१९ रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर जागा घेतली. १ कोटींमध्ये ही जागा घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं. सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून आहे. पण सातच दिवसांत अनिल परब यांनी २६ जून २०१९ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं. जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचं म्हटलंय. पण तो दाखला दाखवलेला नाही”, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले होते. यावेळी आरोप करताना त्यांनी संबंधित खरेदीखत आणि इतर कागदपत्र देखील पत्रकार परिषदेत दाखवली होती.

“७ मे २०२१ रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी १० महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. १० मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. ११ मे २०२१ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या काळासाठीचा ४ वर्षांचा टॅक्स तलाठीकडे भरला”, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2021 9:54 pm

Web Title: transport minister anil parab rs 100 crore defamation suit against somaiya rmt 84
Next Stories
1 “केंद्राने कोविड अनुदान राज्याला पूर्ण मिळेल असे पाहावे”; उद्धव ठाकरे यांच्या नीती आयोग बैठकीत सूचना
2 साताऱ्यात कास पठारावर रानगव्यांचा मुक्त संचार
3 Covid -19 : राज्यात दिवसभरात ३ हजार ६८५ जण करोनामुक्त; ५२ रूग्णांचा मृत्यू
Just Now!
X