नवीन परिवहन ठेकेदार; १ डिसेंबरपासून बससेवा सुरू

वसई : सहा महिन्यांपासून बंद असलेली वसई-विरार शहरातील परिवहन सेवा येत्या १ डिसेंबर पासून नव्याने सुरू होणार आहे. मनमानीपणा करत शहरातील प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराला पालिकेने हाकलल्यानंतर नवीन ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मेसर्स एसएनएन या कंपनीला हा ठेका मिळाला असून त्याचा करारनामा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारमार्फत २०१२ पासून सुरू होती. पालिकेने या ठेकेदाराला गॅरेज तसेच बसगाडय़ांसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. याशिवाय ३० गाडय़ा उपलब्ध करून दिल्या होत्या. ठेकेदाराच्या १३० आणि पालिकेच्या ३० बसेस मिळून ही सेवा ४३ मार्गावर सुरू होती. मात्र, ठेकेदाराने कराराचे उल्लंघन करून बसेसची संख्या वाढवली नव्हती. बसेसचा दर्जा देखील निकृष्ट होता. त्यामुळे प्रवाशांना त्रास व्हायचा शिवाय ध्वनीप्रदूषण देखील होत होते. पावसाच्या काळात अनेक गाडय़ा नादुरूस्त झाल्याने बससेवा बंद ठेवावी  लागली होती. त्यातच करोना विषाणूचे संक्रमण मार्च महिन्यात सुरू झाले आणि करोनाचे कारण देत ठेकेदाराने बससेवा बंद केली होती. मुंबईत पालिकेची बससेवा तसेच एसटीची सेवा सुरू असताना पालिकेची बस सेवा बंद होती. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल सुरू झाले होते. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर कंपन्या आणि कार्यालये सुरू झाली. मात्र परिवहन सेवेच्या बसगाडय़ा बंद असल्याने नोकरदारांना  कामावर जाता येत नव्हते.

आठ कोटी रुपयांच्या करवसुलीचे आव्हान ; ठेकेदाराने थकवलेला ८ कोटींचा कर वसुल करा

ठेकेदाराने प्रवासी कर आणि बालपोषण अधिभार शासनाला भरायचा असतो. पालिकेने तो ठेकेदाराकडून वसूल करायचा असतो. मात्र अद्याप हा कर ठेकेदाराने भरलेला नाही. याबाबत राज्याचे उपलोकायुक्त एस.के.शर्मा यांनी चांगलेच फटकारले होते आणि  परिवहन ठेकेदाराला या करापोटी ८ कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले होते. वसुलीची जबाबदारी पालिकेची असून पालिकेने जर ते वसुल केले नाही तर राज्य सरकारकडून पालिकेला मिळणाऱ्या अनुदानातून ही रक्कम कापली जाईल, असे देखील उपलोकायुक्तांनी सांगितले होते. त्यामुळे पालिकेने ठेकेदाराकडून कर वसुल करा वा त्याची मालमत्ता जप्त करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केली आहे.