|| संतोष सावंत

अपघाताची मालिका कायम; औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर खड्डे; गतिरोधकांची अशास्त्रीय पद्धतीने उभारणी:- तळोजा औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या मार्गावरील प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. त्यामुळे अपघाताची मालिकाही कायम असून रस्त्यावरील खड्डे, पददिवे नसणे, गतिरोधकाची अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आलेली उभारण्ी आदी त्यामागची कारणे असली तरी त्याबाबतचे गांभीर्य ‘एमआयडीसी’ला नसल्याने नागरिकांना प्रवासादरम्यान अपघाताला सामोरे जावे लागत आहे. शनिवारी घडलेल्या पोलीस हवालदाराच्या अपघाती मृत्युने पुन्हा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षीही अशाच एकाच अपघातात एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला होता.

तळोजा औद्यागिक वसाहतीमधून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला. याच अपघातस्थळापासून ३०० मीटर अंतरावर गेल्या वर्षी रात्रीच्या सुमारास  एका वाहतूक पोलिसाचा अपघाती मृत्यू झाला होता. हे दोन्ही अपघात एमआयडीसी परिसरात घडले आहेत. हा रस्ता अंधारमय असतोच, दर पावसाळ्यात या मार्गावर वर्षांनुवर्षे अस्तित्वात असलेले खड्डे दिवसागणिक मोठा आकार धारण करतात. याची कोणतीही खबर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना नसते. यंदाही ती नव्हती. हेच यावरुन दिसून येत आहे.  दुचाकी चालकांसाठी तर हा प्रवास तर जीवघेणा ठरला आहे, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे.

कल्याण ते रोडपाली पोलीस मुख्यालय असा  नेहमीप्रमाणे  सुमारे ३० किलोमीटर अंतरावर कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी  दुचाकीवरून निघाले होते. नागझरी गावाच्या बसथांब्यासमोर अंधार होता, त्यामुळे रस्त्यातील खड्डे व तुटलेला गतिरोधक त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांचा तोल जाऊन त्यांना अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तविली जाते.

एमआयडीसी प्रशासनाच्या अखत्यारीत संबंधित मार्गाची देखभाल करण्यात येते. मात्र येथे वर्षांनुवर्षे खड्डे बुजविले जात नाहीत व रस्ते दुरुस्त केले जात नाहीत, अशा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीचालकांना  ठेचकळतच प्रवास करावा लागतो. तळोजा एमआयडीसीतील परिसरात २१ गतिरोधकांची बांधणी शास्त्रोक्त नाही. त्यामुळे त्यांचा रात्रीच्या वेळी अंदाज येत नाही.   देवरे यांच्यापूर्वी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी अतुल घोगरे यांचासुद्धा याच कारणांनी नितळस गावाजवळील बसथांब्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

‘प्रवेशद्वारावरील कमानी बांधण्यात रस’

गतिरोधक आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याऐवजी प्रवेशद्वारावरील कमानी बांधण्यात एमआयडीसी प्रशासनाला रस आहे, असे येथे म्हटले जात आहे. कमानी बांधण्याच्या कामातही हलगर्जीपणा केल्यामुळे एका कामगाराचा बळी गेला आहे. याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पथदिवे का नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी संबंधित मार्ग हा सेवारस्ता असल्याने तिथे पथदिवे उभारण्याचे ‘एमआयडीसी’चे धोरण नसल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली आहे.