देशांतर्गत वाहतूक सुरु झाल्यानंतर तसेच करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता आता महाराष्ट्र आणि मुंबईत करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कडक पावलं उचलण्यात येत आहेत. त्यासाठी प्रामुख्याने दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यांमधून विमान, रेल्वे आणि रस्ते मार्गाने महाराष्ट्रात आणि मुंबईत प्रवेश करणाऱ्या नागरिकांची आजपासून RT-PCR चाचणी (२५ नोव्हेंबर) बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान, या चाचणीसाठी दादर रेल्वे स्थानकावर नागरिकांची गर्दी झाली आहे.

यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी यापूर्वीच विमान, रेल्वे आणि रस्ता मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जाहीर केलं आहे. त्याचबरोबर सोमवारी नव्या प्रवास नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक असणार आहे. हा अहवाल त्यांना विमानतळांवर तसेच रेल्वे स्थानकांवर दाखवावा लागणार आहे. महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी विमान प्रवाशांना तीन दिवस आधी ही चाचणी करावी लागणार आहे, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येणार नाही.

तसेच जे प्रवाशी कोविडच्या निगेटिव्ह चाचणीसह महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या खर्चाने विमानतळांवर RT-PCR चाचणी करुन घेणे बंधनकारक असणार आहे. ही चाचणी झाल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहे. तसेच ज्या रेल्वे प्रवाशांजवळ कोविड चाचणीचा रिपोर्ट नसेल त्यांची रेल्वे स्थानकांवर अँन्टिजन चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य सचिव कुमार यांनी दिली.

त्याचबरोबर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यातून जे प्रवाशी रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत. त्यांची संबंधित जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाने महाराष्ट्राच्या सीमांवर तपासणी करण्यात येणार आहे. जर कोणत्याही प्रवाशाला कोविडची लक्षणं आढळून आली तर त्यांची अँटिजेन चाचणी करण्यात येईल. तसेच ज्यांची चाचणी निगेटिव्ह असेल त्यांना महाराष्ट्रात प्रवासाला परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर ज्या पॉझिटिव्ह केसेस आहेत त्यांची थेट रवानगी कोविड केअर सेंटर्समध्ये करण्यात येणार आहे.