उन्ह, पाऊस व थंडीपासून प्रवाशांचे संरक्षण व्हावे, यासाठी गावागावात उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्यांची दुर्दशा झाली असून बसस्थानकावरही सोयींचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्य़ात मोठय़ा गावात शासनाकडून बसस्थानक उभारण्यात आले. मात्र, बसस्थानक असूनही प्रवाशांना शेजारच्या पानटपऱ्या व हॉटेलचा आसरा घ्यावा लागत असून सर्वाधिक त्रास महिला प्रवाशांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्य़ातील बसस्थानक व प्रवासी निवाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसते. जिल्ह्य़ातील नागरिकांचे दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या एस.टी. बस आहे. मात्र, राज्य परिवहन महामंडळाचे उदासीन धोरण, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आदी कारणामुळे जिल्ह्य़ातील बसस्थानक व थांबे प्रवाशांसाठी कुचकामी ठरत असल्याचे दिसते. जिल्ह्य़ात गोंदिया व तिरोडा हे आगाराचे ठिकाणाशिवाय देवरी व आमगाव येथे मोठे व पक्के बसस्थानक आहे, तर तालुक्याचे ठिकाण असलेल्या गोरेगाव, सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथे लहान बसस्थानक आहे. अर्जुनी मोरगाव येथे बसस्थानकाच्या नावावर केवळ छपरी आहे. ही सर्व गावे तालुक्याची ठिकाणे असल्याने या बसस्थानकावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठे आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या बसस्थानकाची दूरवस्था झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  
 गोंदिया व तिरोडा बसस्थानकावरून जिल्ह्य़ातील अनेक गावासोबत जिल्ह्य़ाबाहेर बसगाडय़ा सोडल्या जातात. या बसस्थानकावरून लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही बसफेरी सुरू आहे. मात्र, संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही बसस्थानके समस्याचे माहेरघर बनल्याचे निदर्शनास येत आहे. गोंदिया येथील बसस्थानकात अनेक असुविधा असून अस्वच्छतेने कळस गाठला असून प्रवाशांना तोंडावर रुमाल ठेवून येथे उभे राहावे लागते. तिरोडा बसस्थानक गेल्या दोन तीन वर्षांपासून प्रवाशांऐवजी प्रेमवीरांच्या भेटण्याचे स्थान झाल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे. मात्र, स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवासी बसस्थानकाऐवजी बाहेरच बसची प्रतीक्षा करणे पसंत करीत आहे. हीच परिस्थिती देवरी येथील बसस्थानकाची आहे. त्याशिवाय, अनेक समस्या येथे असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अर्जुनी मोरगाव येथे बसस्थानक प्रस्तावित असूनही त्याचे काम प्रलंबित आहे, तर आमगाव येथील बसस्थानक प्रवाशांसाठी पांढरा हत्ती ठरला आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोरेगाव व सडक अर्जुनी येथे बसस्थानकाच्या नावावर केवळ प्रवासी निवारा उभा आहे. त्यामुळे प्रवासी मोठय़ा प्रमाणात तर सुविधांचा अभाव, अशी परिस्थिती असल्याने येथील प्रवाशांनाही अनेक गरसोयींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्य़ातील हजारावर महत्त्वाच्या गावात प्रवासी निवारे तयार करण्यात आले आहे. मात्र, हे निवारे आता केवळ शोभेच्या वास्तू ठरल्याचे दिसत आहे. बहुतांश प्रवासी निवारे पडलेले असून, त्याठिकाणी घाण व कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. काही प्रमाणात चांगल्या स्थिती असलेल्या प्रवासी निवाऱ्यांचा उपयोग स्थानिक नागरिक विविध कामासाठी करीत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे जिल्ह्य़ातील ही प्रवासी निवारे ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी कुचकामी ठरलेले आहेत. जिल्ह्य़ातील बसस्थानके व प्रवासी निवारा, प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून, संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकीकडे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे शासकीय मालमत्तेची दूरवस्था होत आहे. याबाबत शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील प्रवासी निवारे हे बहुतांश आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून तयार करण्यात आलेले आहेत. मात्र, याठिकाणी पिण्याच्या व शौचालयाच्या सोय नसल्याने प्रवासी, प्रवासी निवाऱ्यांचा उपयोग घेत नसल्याचे दिसते. आमदारांनी प्रवाशांचे हित लक्षात घेऊन प्रवासी निवारे उभे करून दिले. मात्र, त्यानंतर काही वर्षांने त्या प्रवासी निवाऱ्यांचे काय झाले, याचा पाठपुरावा झालेला दिसत नाही. परिणामी, आज हे प्रवासी निवारे शोभेच्या वस्तू ठरलेल्या दिसत आहेत. त्यामुळे आपण उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा उपयोग जनतेला होतो काय, याचा पाठपुरावा आमदारांकडून झाल्यास, प्रवासी निवाऱ्यांसोबतच, प्रवाशांच्या समस्यांची जाणीव होईल व दृष्टीने त्यांच्याकडून प्रयत्न केले जातील, अशी आशा आहे.