महाराष्ट्रातील सरकार हे विश्वासघातकी असून सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. १२ कोटींच्या राज्यात रोज केवळ १८ हजार नागरिकांना शिवभोजन मिळणार आहे. सरकारचे सर्व निर्णय हे लोकांचा विश्वासघात करणारे असून, हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ दगडपारवा आणि चोहट्टा बाजार येथील जाहीरसभेत ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असताना शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबतीने दगाफटका करून सरकार स्थापन केले. स्वार्थासाठी कोणी काहीही करू शकते, हेच त्यातून दाखवून दिले. जनतेने हरवलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेने सत्ता स्थापन केली. त्यांचे सरकार जनतेच्या मनातील नाही. हा लोकशाहीचा अनादर आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. भारताच्या इतिहासात बेइमानीने मिळवलेले राज्य कधीच दीर्घकाळ चालले नाही. ते सहा महिन्यातच लयास गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच आधी सत्ता स्थापन करणे, त्यानंतर मंत्रिपद वाटप, मंत्र्यांना खातेवाटप करण्यात कमालीचा विलंब लागत आहे. त्याचवेळी कॅबिनेटची मागणी असताना राज्यमंत्री पद दिल्याने नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी आजच राजीनामा दिला. ही बाब सरकार अधिक काळ चालणार नसल्याचे संकेत आहेत, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेत मागील दोन दशकांपासून सत्तेत असणाऱ्या भारिप बहुजन महासंघाने लोकांच्या विकासाचा निधी पूर्णत: खर्च न करता ग्रामीण भागाला विकासापासून दूर ठेवण्याचे काम केले, असा आरोपही त्यांनी केला. आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात अकोला जिल्ह्यासह विदर्भ व मराठवाडय़ाच्या विकासात देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सिद्धार्थ शर्मा, तर आभार प्रदर्शन राजू नागमोते यांनी केले.