जळगाव जिल्ह्य़ातील सातपुडा पर्वतरांगा जैवविविधता संपन्न आहेत. त्यात अनेक दुर्मीळ प्राणी, वनस्पती यांचा अधिवास असून सातपुडा पर्वत रांगा अनेक दुर्मीळ ऑर्किड्सने संपन्न आहेत. यात वन्यजीव संरक्षण संस्थेचे वनस्पती अभ्यासक राहुल सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांना जिव्हापुष्प आणि सुवर्ण शिखी या दोन आमरी तसेच ‘हेटेरोस्टिया डलझेली’ आणि ‘युत्रिक्युलारिया ऑरिया’ (सोन जठरी) अशा एकूण चार वनस्पती जळगावच्या वनस्पती सूचीत जोडण्यात यश आले आहे. यातील सोन जठरी ही कीटकभक्षी वनस्पती मुक्ताई सागर (हतनूर) धरण परिसरात नोंदवली गेली आहे.

‘पेरिस्टायल्युस प्लान्टाजिनियस’ म्हणजेच जिव्हापुष्प ही ऑर्किड कुळातील वनस्पती असून तिच्या फुलाची खालची पाकळी जिभेसारखी दिसते म्हणून तिला जिव्हा पुष्प हे नाव आहे. ही वनस्पती डोंगरउतारावर बांबूंच्या तसेच इतर वृक्षांच्या छायेत कुजणाऱ्या पालापाचोळ्यांमध्ये वाढते. ही जमिनीवर वाढणारी आमरी असून ९० सेंमींपर्यंत वाढते. ‘युरो इयुलोफिया ऑर्केट’ म्हणजेच सुवर्णशीखी हीसुद्धा जमिनीवर वाढणारी ऑर्किड कुळातील वनस्पती असून पहिल्या पावसाबरोबर ही वाढायला लागते. पाने, फुले सोबतच येतात. डोंगरउतारावर पालापाचोळयात ही वनस्पती जून महिन्यात फुलते. हिला मराठीत पिवळा अमरकंदही म्हणतात.

या महत्त्वपूर्ण वनस्पती नोंदी जळगाव जिल्ह्य़ाचे वनस्पती वैभव अधोरेखित करतात. या वनस्पतीसंबंधीचा शोधनिबंध नुकताच ‘इला जर्नल फॉर फॉरेस्टइला जर्नल फॉर फॉरेस्टी अ‍ॅण्ड वाइल्डलाइफ’ या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. या संशोधन कार्यात राहुल सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांना डॉ. आर. जी. खोसे, डॉ. मिलिंद सरदेसाई, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच  अमन गुजर, गौरव शिंदे, संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, रवींद्र सोनवणे, बाळकृष्ण देवरे, राजेंद्र नन्नवरे, भूषण चौधरी, चेतन भावसार यांचे सहकार्य लाभले.

सातपुडय़ासह जळगाव वनक्षेत्रात अनेक दुर्मीळ वनस्पती, प्राणी, पक्षी आणि एकूणच जैवविविधतेतील अनेक दुर्मीळ घटकांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यात जळगाव आणि यावल वन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. दिगंबर पगार आणि संजयकुमार दहिवले यांच्या कार्यकाळात जळगाव, यावल वनक्षेत्रास भरभराटीने वेग घेतला. वन्यजीवचे वनाधिकारी अनिल अंजनकर, अश्विनी खोडपे, जितेंद्र गावंडे, अक्षय म्हेत्रे, धनंजय पवार आणि वनकर्मचारी वेळ प्रसंगी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत आमचे संशोधन वन विभागालाच समर्पित आहे.

-राहुल सोनवणे (अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव )