प्रबोध देशपांडे

अकोला : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून राज्यात आतापर्यंत ३७ लाखांवर रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार झाले आहेत. ४६ ते ५५ वयोगटाला योजनेचा सर्वाधिक लाभ झाला. गरीब व गरजू रुग्णांसाठी ही योजना दिलासादायक ठरत आहे.

राज्यात जन आरोग्य योजनेचा पहिला टप्पा २ जुलै २०१२ पासून गडचिरोली, अमरावती नांदेड, सोलापूर, धुळे,रायगड, उपनगरीय मुंबई, मुंबई शहर या आठ जिल्ह्यत कार्यान्वित करण्यात आला होता. २१ नोव्हेंबर २०१३ पासून ही योजना राज्यव्यापी करण्यात आली. १३ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे नामकरण करून ती सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. २३ सप्टेंबर २०१८ पासून आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले योजना एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. राज्याच्या योजनेमध्ये ३४ विशेषज्ञ सेवांतर्गत ९९६ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत एक हजार २०९ उपचार व १८३ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.

राज्यात योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३७ लाख ६८ हजार ६८५ रुग्ण उपचारासाठी पात्र ठरले. त्यांच्यावरील उपचारासाठी आठ हजार ८३७ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. त्यातील ३७ लाख ४६ हजार १५१ रुग्णांवर शस्त्रक्रिया व इतर उपचार झाले असून त्याची रक्कम आठ हजार ७७७ कोटी आहे. आतापर्यंत ३४ लाख २१ हजार ७७८ रुग्णांवरील उपचाराची सात हजार ३३८ कोटीची रक्कम रुग्णालयांना अदा करण्यात आली आहे. योजनेमध्ये मुंबई व उपनगरातील सर्वात जास्त तीन लाख ६९ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

पालघर जिल्हय़ात योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. केवळ एक हजार ८७७ रुग्णांवर उपचार झाले. वयोगटानुसार ४६ ते ५५ गटातील सर्वाधिक सात लाख ९३ हजार १४८ रुग्णांवर उपचार झाले. सध्या योजनेमध्ये राज्यातील खासगी आणि शासकीय ९७३ रुग्णालये नोंदणीकृत आहेत.

पुरुष रुग्ण अधिक

राज्यात योजनेचा लाभ घेण्यात महिलांपेक्षा पुरुष रुग्ण पुढे आहेत. आतापर्यंत २१ लाख ५९ हजार ६५८ पुरुष, तर १६ लाख ०८ हजार ६२७ महिला रुग्णांनी योजनेंतर्गत उपचार करून घेतले आहेत.

७८ हजारावर रुग्णांचा मृत्यू

योजनेंतर्गत उपचार घेतांना राज्यातील एकूण ७८ हजार ८५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शासकीय रुग्णालयात २७ हजार ३३४, तर खासगी रुग्णालयांमध्ये ५१ हजार ५१८ रुग्णांचे प्राण गेले आहेत.