जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ५०० करोनाबाधित रुग्णांवर उपचाराची सुविधा

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता  आरोग्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक सशक्त होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याप्रमाणे यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात काळजीवाहू केंद्र (कोविड केअर सेंटर), समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि समर्पित कोविड रुग्णालये या अंतर्गत सुमारे ५००  करोना बाधितांवर उपचारासाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यकता भासल्यास ही व्यवस्था दुप्पट करण्याच्या दृष्टीनेही प्रशासनाची तयारी आहे. ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या १२५च्या पुढे असून त्यापैकी ६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोविड  केअर सेंटर

ज्या नागरिकांना सर्दी, खोकला व ताप व करोना सदृश्य लक्षणे दिसतात त्यांची तपासणी व उपचार करण्यासाठी  ग्रामीण भागात १९ कोविड  केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. याठिकाणी रुग्णांचे तापमान तसेच पल्स मीटरद्वारे तपासणी केली जाते. या उपचार केंद्राची क्षमता अठराशेपर्यंत वाढवण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.  कोविड केअर सेंटरमध्ये स्वतंत्र विभाग करून लक्षणे दिसून न येणाऱ्या करोना रुग्णांना दाखल करण्यासाठी स्वतंत्र विभाग उभारण्यात आला आहे. याठिकाणी आयुष्य वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून या ठिकाणी गंभीर होणाऱ्या आवश्यकतेनुसार समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये रुपचारासाठी हलवण्याची व्यवस्था आहे.

समर्पित कोविड आरोग्य केंद्र

करोना आजाराची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना दाखल करण्यासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालय (२०), डहाणू येथील ट्रोमा केअर सेंटर रुग्णालय (२०), आयडीला रुग्णालय वाडा (१००) तसेच दयानंद रुग्णालय तलासरी (५०) येथे सुविधा उपलब्ध आहे. सध्या अशा समर्पित कोविंड आरोग्य केंद्रमधील वैद्यकीय उपचाराची क्षमता १९० खाटांची असली तरीही त्यामध्ये आवश्यकता भासल्यास वेदांता रुग्णालय, डहाणू येथे २५० खाटांची भर टाकण्यासाठीची तयारी हाती घेण्यात आली आहे. अशा प्रत्येक समर्पित कोविड आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर, वेंटिलेटर उपलब्ध असून अशा ठिकाणी प्रत्येक खाटेवर प्राणवायू पुरवण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

समर्पित कोविड रुग्णालय

करोना सोबत वेगेवेगळे आजार किंवा गंभीर रुग्णांसाठी जिल्ह्यात समर्पित कोविड रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत बोईसर येथील टीमा रुग्णालयात अशा तीस रुग्णांना दाखल करण्याची सुविधा असून विक्रमगड रिवेरा रुग्णालयात येथे अशा प्रकारच्या दोनशे खाटांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय रिवेरा येथील केंद्रामध्ये ५० आयसीयु खाटांचा समावेश आहे. याखेरीज आवश्यकता भासल्यास पालघर येथील डॉ.  ढवळे रुग्णालयात (५०) तसेच डहाणू येथील वेदांता वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात(२५०) अशा एकूण तीनशे अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. अशा केंद्रांमध्ये डायलिसिस, प्रसूती, अस्थिरोगतज्ज्ञ विभाग व लहान शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था असून या ठिकाणी निर्माण होणारे जैववैद्यकीय घनकचरा विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी व जेवण पुरवण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे.

आवश्यकता भासल्यास ४० नवीन व्हेंटिलेटर

ग्रामीण  भागात सध्या २४ ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा असून सात नव्याने विकत घेतलेले व्हेंटिलेटर लवकरच दाखल होण्याच्या स्थितीत आहेत.  आवश्यकता भासल्यास वैद्य्कीय विभागाच्या संचालकांकडून ४० नवीन व्हेंटिलेटर खरेदी करण्याची तांत्रिक परवानगी पालघर जिल्ह्याने प्राप्त केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.