३९ खासगी रुग्णालयांपैकी फक्त तीन रुग्णालयात अंमलबजावणी

पालघर : पालघर जिल्ह्यात गंभीर होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या जेमतेम दीडशे ते दोनशे खाटांची सुविधा असताना १४००हून अधिक रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयात गरीब व गरजू व विशेषत: आदिवासी रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवण्याची मागणी पुढे येत आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३९ खासगी रुग्णालयापैकी फक्त तीन रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यरत असून त्याचा फटका सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना बसत आहे.

पालघर जिल्ह्यातील वाढती करोना रुग्णांची संख्या पाहता पालघर ग्रामीण भागात एकंदर ४४हून अधिक रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा रुग्णालयांमध्ये १४००पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत असून ग्रामीण भागातील एक व वसईमधील दोन रुग्णालयांमध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यरत आहे. आजाराच्या पहिल्या लाटेत या योजनेंतर्गत झालेल्या बिलासंदर्भात अनेक तक्रारी पुढे आल्याने तसेच रुग्णालयांना योजनेतून पैसे मिळण्यास कठीण झाल्याने अनेक रुग्णालयांनी ही योजना राबवण्याचे बंद केले आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसत आहे.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना गंभीर होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जेमतेम दीडशे ते दोनशे खाटा उपलब्ध आहेत. अनेक गरीब, आदिवासी व गरजू रुग्णांना खासगी उपचार परवडत नसल्याने असे रुग्ण उपचाराविना राहण्याचे किंबहुना तपासणीस करीत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे रुग्ण गंभीर होण्याच्या व दगावण्याचा दर वाढला आहे. या पार्श्वभूमी  वर खासगी रुग्णालयातील खाटांपैकी काही खाटा जिल्हा प्रशासनाने आरक्षित ठेवून गरजू रुग्णांची विनामूल्य उपचार करून घ्यावेत अशी मागणी पुढे येत आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील काही रुग्णालये अधिग्रहित करून विनामूल्य आरोग्य सेवा पुरवण्याची व्यवस्था हाती घेणे आवश्यक झाले आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या गैरहजेरीत उपचार

शासकीय वैद्यकीय व्यवस्था वाढवणे शक्य नसल्याने जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. अशा रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर फिजिशियन असणे बंधनकारक असताना या प्राथमिक अटींचा काही ठिकाणी भंग होत असल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या गैरहजेरीत उपचार करताना रुग्ण गंभीर होऊन मृत पावण्याचे प्रकार घडले असून अशा रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, विक्रमगड येथील शारदा रुग्णालय व डहाणू येथील मेट्रोफिनिक्स रुग्णालय व्यवस्थापन यांनी आपण करोना रुग्णालय कार्यरत ठेवू शकणार नसल्याचे शल्यचिकित्सक कार्यालयाला कळवले आहे.