अनामत रक्कम भरल्यानंतरच उपचारास सुरुवात; विविध दरांच्या नावाखाली मनमानी वसुली

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : करोनाच्या काळात नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले असताना खासगी रुग्णालये रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत. नागरिकांचा आरोग्य विमा असतानाही आधी अनामत रक्कम भरा मगच उपचार केले जातील, असा पवित्रा रुग्णालयांनी घेतला आहे. नोंदणीकृत रुग्णालयातही कॅशलेस विम्याची तरतूद असताना विविध दरांच्या नावाखाली ही रक्कम आकारली जात आहे, तर  दुसरीकडे विमा कंपन्या सरसकट विमा मोबदला नाकारत आहेत. यामुळे आता सामान्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

आजारपणाच्या वेळी उपचार व्हावा म्हणून नागरिक पदरमोड करून बिगररोकड (कॅशलेस)आरोग्या विमा उतरवतात. सर्वसाधारण विम्यामध्ये आधी पैसे भरले की नंतर त्याचा परतावा मिळतो. बिगररोकड  विम्यामध्ये रुग्णाला थेट उपचार मिळतात आणि तो खर्च विमा कंपन्या रुग्णालयाला देत असते. मात्र या कोरोनाकाळात बिगररोकड विम्याचे नियम धाब्यावर बसवून रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे. वसई-विरारमधील करोनावर उपचार करणारी रुग्णालये कॅशलेस विमा असतानाही रुग्णांकडून अनामत रक्कम जमा घेतल्याशिवाय रुग्णालयात दाखल करून घेत नाहीत. करोना काळात आर्थिक तंगी असणाऱ्या सामान्य नागरिकांना आता त्यांच्या आरोग्य विम्याची कवचकुंडले दिलासा देत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे उपचारासाठी पैसे कुठून आणायचे या चिंतेने नागरिक हवालदिल झाले आहेत.

वसई-विरार शहरात पालिकेचे रुग्णालय नसल्याने रिद्धिविनायक हे खासगी रुग्णालय अधिग्रहित केले आहे, तर इतर ११ खासगी रुग्णालयात करोनावर उपचार केले जातात. मात्र बिगररोकड विम्याची सोय असतानाही अनामत रक्कमेशिवाय रुग्ण दाखल करून घेतले जात नाहीत. वसईतील रुग्णालये कोणत्याही प्रकारचा विमा असला तरी ५० ते ७० हजार रुपये अनामत रक्कम स्वीकारूनच रुग्णांवर इलाज करत आहेत. यामुळे एका कुटुंबात जर तीन ते चार व्यक्ती असल्यास आणि त्यातील काहींना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली, तर त्यांना एका वेळी लाखो रुपये उभे करण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त व्याजाने कर्ज घेऊन इलाज करावा लागत आहे.

करोनाबाधित रुग्णावर होणारे उपचार, डॉक्टर शुल्क, हॉस्पिटलचा खर्च, औषधांचा खर्च हे सर्व विम्यात सामील आहेत. मात्र या धोरणांत वैयक्तिक संरक्षणासाठी वापरलेल्या वस्तू, उपकरणांचा समावेश नाही. यात पीपीई कीट, स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, रुग्ण नियमित वापरत असलेले इंजेक्शन, औषधे इत्यादी गोष्टी सामील होत नाहीत. त्याचे पैसे रुग्णाला आपल्या खिशातून द्यावे लागतात, म्हणून रक्कम आगाऊ  घेतली जाते, असे रुग्णालय सांगतात.

नालासोपारा येथील रहिवासी होशियार सिंग दासोनी यांचे स्टार हेल्थ विमा कंपनीचे ३० लाखांचा कॅशलेस विमा आहे, पण त्यांनासुद्धा उपचार घेण्यासाठी रुग्णालयात आधी ३० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागली. अशाच प्रकारे वसई येथील रहिवाशी विशाल राजेमाहडिक यांच्यासोबतही झाले आहे. विमा कंपनीने त्यांचा दावाही नाकारला आहे. त्यांनी पुन्हा कंपनीकडे पैसे मिळण्यासाठी अर्ज केला आहे, पण अद्यापही त्यांना कोणतेही उत्तर आले नाही.

हा विषय खासगी विमा कंपनीशी निगडित असल्याने त्यात प्रशासन कोणतीही भूमिका घेऊ शकत नाही. पण मुळात विमा घेताना नागरिकांनी थोडी खबरदारी घेतली पाहिजे. जर आरोग्य विम्यामध्ये करोना उल्लेख असेल तर त्यांना विमा मिळायला पाहिजे. यासंदर्भात आम्ही चौकशी करू आणि त्यांनतर योग्य निर्णय घेऊ.

– दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी