News Flash

‘कोकणात वृक्षसंहार थांबवितानाच प्रदूषणकारी प्रकल्प नको’

माझा जन्म पारतंत्र्यात झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणात सर्वत्र घनदाट जंगले होती.

कोकणात औष्णिक, आण्विक, रासायनिक प्रकल्प नको तसेच कोकणातील वृक्षसंहार थांबल्यास कोकण सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास वृक्षमित्र सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा वृक्षमित्र सेवा संघाची सभा कणकवलीत वृक्षमित्र सेवा संघाच्या सभागृहात झाली, त्यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. यावेळी प्रा. सुभाष गोवेकर, शांताराम नारकर, लाडोबा तावडे, विश्वनाथ केरकर, आनंद मेस्त्री, बाबुराव आचरेकर, बबन दळवी आदी उपस्थित होते.
कोकणात प्रचंड वृक्षतोड, वर्षांनुवर्षे अपूर्ण राहिलेली धरणे आणि वृक्षारोपण व संवर्धन यांचा वाजलेला बोजवारा हीच दीडशे इंच पाऊस पडणाऱ्या कोकणातील पाणीटंचाईची कारणे आहेत. याला शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, अशी टीका प्रा. नाटेकर यांनी केली. संबंधितांवर कठोर कारवाई करून वृक्षसंहार थांबविल्यास कोकणातील पाणीटंचाई दूर होऊन कोकणात समृद्धी येईल असे नाटेकर म्हणाले.
माझा जन्म पारतंत्र्यात झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणात सर्वत्र घनदाट जंगले होती. ब्रिटिशांच्या कडक शिस्तीमुळे वृक्षतोड होत नव्हती. त्यामुळे खळखळणारे ओढे होते, बारमाही वाहणाऱ्या नद्या होत्या. नद्यांना बांध घालून वायंगणी (दुपिकी) शेती केली जायची, असे प्रा. नाटेकर म्हणाले. स्वराज्य आले आणि त्यासोबत स्वैराचारदेखील आला. लाकूड व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून वृक्षांची कत्तल केली. त्यामुळे डोंगर बोडके होऊन पाणीटंचाईचे संकट आले आहे, असे नाटेकर म्हणाले.
वृक्षांवर पाऊस पडतो तेव्हा थेंबाथेंबाने पाणी जमिनीत पडून ते जमिनीत मुरते. नैसर्गिक जलसिंचन होते. या पाण्याचा झाडांना उपयोग होतो, तसेच झऱ्याद्वारे पाणी पिकासाठी, शेतीसाठी वापरले जाते. पण वृक्षतोडीमुळे धूप होऊन नद्यांची पात्रे, तलाव गाळाने भरून कोरडे पडले आहेत. त्यामुळे तेही एक पाणीटंचाईचे कारण कोकणासाठी बनले आहे, असे प्रा. महेंद्र नाटेकर म्हणाले.
विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र येथील पाणीटंचाई, तेथे केलेली ऊस लागवड, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर, औष्णिक प्रकल्प व बांधकाम यामुळे प्रचंड उष्णता वाढली आहे. ढगांना खाली आणणारा हवेतील थंडावा कमी झाला आहे. उष्ण वारे वाहू लागल्याने ढग तेथे न थांबताच पुढे जाऊ लागले आहेत. त्यामुळेच तेथे फारसा पाऊस होत नसल्याने दुष्काळी वातावरण आहे, असे प्रा. नाटेकर म्हणाले. कोकणातील काही गावात निर्माण झालेली पाणीटंचाई घाटमाथ्यावरील पाणीटंचाईहून भिन्न आहे. त्यामुळे कोकणात औष्णिक, आण्विक, रासायनिक प्रकल्पांना विरोध व्हायला हवा, असे प्रा. नाटेकर यांनी सांगितले. कोकणातील वृक्षांची कत्तल थांबवावी, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाला साथ द्यावी, म्हणून आम्ही गेली ३५ वर्षे चळवळ उभारली आहे, असे प्रा. नाटेकर म्हणाले.
कोकणातील शेतकरी, लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाने कोकणाचे कोकणपण नष्ट होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा दुष्काळाचे सावट कोकणावर येण्याची भीती प्रा. महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2016 1:52 am

Web Title: tree friends service association president prof mahendra natekara speak on konkan
Next Stories
1 ‘गीत गीतामृत’चे आयोजन
2 गणित अध्यापकांचे अधिवेशन नेरुरपारला
3 पोलीस पाटील पदे भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम
Just Now!
X