06 December 2019

News Flash

वृक्षलागवड मोहिमेची १४ जिल्हय़ांमध्ये कासवगती

३० टक्क्यांपेक्षा कमी लागवडीमुळे ‘रेड झोन’मध्ये समावेश  

(संग्रहित छायाचित्र)

प्रबोध देशपांडे

राज्यातील वनविभागाच्या महत्त्वाकांक्षी ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात १४ जिल्हय़ांमध्ये कासवगतीने काम सुरू आहे. २२ दिवसांत राज्यातील १४ जिल्हय़ांमध्ये ३० टक्क्यांपेक्षाही कमी वृक्ष लागवड झाल्याने या जिल्ह्य़ांचा समावेश ‘रेड झोन’मध्ये करण्यात आला. वृक्षलागवड कार्यक्रमात ११५ टक्के लक्ष्यांक पूर्ण करून मुंबई उपनगर अग्रेसर आहे.

‘हरित महाराष्ट्र’ संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी राज्यातील सध्याचे वन क्षेत्र २० वरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सन २०१७ पासून तीन वर्षांत ५० कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. त्याअंतर्गत चार कोटी, १३ कोटी वृक्षारोपण करण्यात आले. सन २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी विविध विभाग आणि यंत्रणांसाठी उद्दिष्ट ठरवण्यात आले. १ जुलै ते ३० सप्टेंबपर्यंत ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेसाठी ३५ कोटी ९८ लाख ४७ हजार ७९८ रोपे तयार करून ३२ कोटी ६७ लाख ९८ हजार २७० खड्डे करण्यात आले. २१ जुलैपर्यंत १२ कोटी ४७ लाख ३८ हजार १८० वृक्षलागवड करण्यात आली असून, त्यामध्ये २८ लाख ५८ हजार ४८८ जणांनी सहभाग घेतला. राज्यात एकूण ३६.१६ टक्के उद्दिष्टांची पूर्ती झाली आहे.  राज्यातील ३६ जिल्हय़ांसाठी प्रत्येक जिल्हानिहाय लक्ष्यांक निश्चित करण्यात आला. योजनेतील जिल्हय़ांच्या कामगिरीनुसार रेड, ब्ल्यू, ब्राऊन आणि ग्रीन असे वर्गीकरण करण्यात आले. यामध्ये रेड झोनमध्ये १४ जिल्हय़ांचा समावेश असून तेथे उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३० टक्क्यांपेक्षा कमी वृक्षलागवड  करण्यात आली. सर्वाधिक १७ जिल्हे ब्ल्यू झोनमध्ये येतात. त्या जिल्हय़ांमध्ये ३० ते ६० टक्के वृक्षलागवड झाली.

ब्राऊन झोनमधील चार जिल्हय़ात ६० टक्क्यांवर उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. सर्वाधिक मुंबई उपनगरांमध्ये ११५ टक्के वृक्षारोपण करण्यात आले. मुंबई उपनगरांना केवळ एक लाख ३६ हजार २०० चे उद्दिष्ट असून, त्यांनी एक लाख ५६ हजार ७३६ वृक्षलागवड केली. यावर्षी वृक्षलागवड कार्यक्रमाचा कालावधी तब्बल तीन महिन्यांचा असल्याने वृक्षारोपणात चालढकलपणा सुरू असल्याचे दिसून येते.

मुंबई, नागपूरसह १४ जिल्हय़ांत उदासीनता

राज्यातील ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत मुंबई, नागपूरसह १४ जिल्हय़ांत उदासीनता दिसून येते. २१ जुलैपर्यंत राज्यात मुंबई शहरामध्ये सर्वात अल्प ८.४० टक्के वृक्षलागवड झाली. नागपूरमध्ये २३.९३ टक्के, अकोला २६.९३, बीड १९.३६, हिंगोली २४.६७, जालना २९.१०, लातूर १३.१०, नंदूरबार २७.७१, उस्मानाबाद २१.७४, परभणी १३.४९, सोलापूर १७.१६, वर्धा २१.२६, वाशीम २६.९० व यवतमाळ जिल्हय़ात २७.५१ टक्के वृक्षलागवड करण्यात आली आहे.

First Published on July 23, 2019 1:26 am

Web Title: tree lagging campaign slows down in 3 districts abn 97
Just Now!
X