यंदाच्या पावसाळय़ात शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत २३ लाख ५० हजार सुधारित रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, पाऊसच लांबल्याने रोपे लागवडीच्या कामातील अपयशही झाकोळले गेल्याचे बोलले जात आहे.
शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ात लावलेल्या रोपांपकी किती रोपे जिवंत आहेत, याची चौकशी झाल्यास सत्य काय ते बाहेर पडेल. मात्र, याकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आहे. आता तर पाऊसच लांबल्याने रोपे लागवड कार्यक्रमाची अंमलबजावणी म्हणजे सुंठेवाचून खोकला गेला असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
मागील पावसाळय़ात शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ३१ लाख ५० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यासाठी आवश्यक असलेल्या खड्डय़ांची शासनदरबारी असलेली नोंद ३१ लाख २३ हजार, म्हणजे ९७ टक्के, तर २८ लाख ९८ हजार रोपे लागवड म्हणजे ९० टक्के लागवड झाल्याची कागदोपत्री नोंद आहे. मात्र, कागदोपत्री नोंदीवरच यंत्रणा समाधानी आहे. वास्तविक, प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे. त्यामुळेच जिवंत रोपांची वरिष्ठ पातळीवर तपासणी करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
यंदा शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यास सुधारित २३ लाख ५० हजारांचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने वन विभागाकडून ९ लाख ८४ हजार, तर कृषी विभागाकडून ९२ हजार खड्डे खोदण्यात आल्याची शासन दरबारी नोंद आहे. परंतु पावसाने ताण दिल्याने योजनेचे अपयश तर दडले आणि लागवडीच्या नावाखाली अंग झटकताना सुंठेवाचून खोकला गेला, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.