मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ ऑगस्टपर्यंत बुजवण्यात येतील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. मात्र सध्याची महामार्गाची अवस्था पाहता हि घोषणा हवेतच विरून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील सात वर्ष चौपदरीकरणाचे काम रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग सध्या खड्ड्यात हरवला आहे. पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील महामार्गाची दयनीय अवस्था पाहता येत्या १५ ऑगस्टला महामार्गावर पडलेल्या खड्डयांमध्ये मनसे एक लाख वृक्ष लागवड करणार असल्याचे मनसे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी जाहिर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. त्यामुळे कोकणात जाणारयांची गर्दी प्रचंड वाढणार आहे. मात्र महामार्गावरील खड्ड्यांची परिस्थिती पाहता चाकरमान्यांचा प्रवास खडतर होणार असून या खड्ड्यांमुळे मोठ्या अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. चौपदरीकरणाचे काम तारीख पे तारीख देत सात वष्रे रखडवणार्या यंत्रणा आणि ठेकेदाराविरुध्द तीव्र संताप व्यक्त होत असून यापुढे येथे महामार्गावर अपघातात कुणाचा मृत्यू झाल्यास ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.  वडखळ बायपास, सुकेळी िखड, कर्नाळा िखडीतील कामेही अपूर्ण आहेत. घाईत पूर्ण केलेली कामे निकृष्ठ दर्जाची झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या अंधारात तर महामार्गावरील प्रवास म्हणजे जीवाशी खेळ ठरतोय. तर प्रवाशांना बोटीतून प्रवास केल्याचा अनुभव महामार्गावरून प्रवास करतांना येत आहे. या खड्ड्यांमुळे प्रवाशांना पाठदुखी, मानदुखी सारखे आजार बळावत आहेत . मात्र, याकडे ठेकेदार आणि रस्ते महामंडळ सपशेल दुर्लक्ष करत आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून महामार्गाच्या कामांना गती मिळाली, पूर्वीचे सरकार दिवसाला दोन किलोमीटर रस्ता बनवायचे, आता भाजप सरकारच्या काळात दररोज ३० किलोमीटरचे रस्ते होण्यास सुरवात झाली. रखडलेले प्रकल्प मार्गी लागले, सत्ताधारयांच्या या नेहमीच्या टेपचाही लोकांना वैताग आला आहे. सरकार बदलून चार वष्रे लोटली तरी मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती काही बदललेली नाही. घोषणा अनेक झाल्या मात्र काम पुढे सरकत नाहीच. इंदापूर ते झाराप दरम्यानचा मुंबई-गोवा महामार्गाचा दुसरा टप्पा, त्याला जोडणार्या प्रमुख राज्य मार्ग, बंदरांना जोडणार्या मार्गाचे रुंदीकरण करण्याच्या घोषणा झाल्या. मात्र यातील एकाही कामाने प्रत्यक्षात गती घेतलेली दिसत नाही. थोडक्यात काय तर मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत सरकारने कोकणवासीयांना निव्वळ गाजर दाखवले आहे, असा संताप व्यक्त होत आहे.  प्रामुख्याने  पळस्पे ते कर्नाळा िखड, जीते ते हमरापुर, हमरापूर ते भोगावती पूल, पेण ते वडखळदरम्यान रस्त्याची मोठया प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यातच मुसळधार पावसात हमरापूरचा पूल देखील खचला. घाईत केलेले पुलाचे काम निकृष्ट झाले आहे. मुख्य रस्त्याचे काम जवळपास बंद आहे. या पुलाला खालील बाजूच्या पिलरला तडे गेले आहेत. त्यावर सिमेंटचा मुलामा सध्या चढविला आहे. हा पूल दोन ठिकाणी खचला असून काहीच दिवसात मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.   पळस्पे ते इंदापूरदरम्यान महामार्गावर चिखल आणि खड्डे यांचेच साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांची तारेवरची कसरत आणि वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. अपघातांचा आकडा दररोज वाढतो आहे. खड्डयात आपटून चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होत आहेत. गेल्या दोन महिन्यांत पनवेल ते पेणदरम्यान अशा चार घटना घडल्या आहेत. येत्या १५ ऑगस्टपूर्वी नुसती डागडुगी न करता सुरळीत रस्ता न केल्यास देशाच्या स्वातंत्र्य दिनी या महामार्गावर पडलेल्या खड्डयांमध्ये मनसे एक लाख वृक्ष लागवड करणार असल्याचे पत्रक मनसे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी प्रसिद्ध केले आहे.  महामार्गाची दयनीय अवस्था पाहता व चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या आंदोलनात भाग घेणार असल्याचे सांगीतले जात आहे.