मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते पाऊस कमी होण्याची वाट पाहत आहे.

तसेच या खड्डय़ात वृक्षारोपण करणारे राजकारण सुरू झाले असून राजकीय पक्षानी श्रमदानाने खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतल्यास जीवघेणा प्रवास सुखकर होईल, असे बोलले जात आहे.

खासदार विनायक राऊत यांनी हायवेवरील जीवघेण्या खड्डय़ांची वस्तुस्थिती घटनास्थळी जाऊन पाहिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जीवघेण्या खड्डय़ात डांबरीकरण करा अशी मागणी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात दरवर्षी मुसळधार पाऊस  कोसळून रस्त्यांची दुर्दशा होते. सार्वजनिक बांधकाम खाते दरवर्षी खड्डेही भरण्यास पुढाकार घेत आहे, पण अतिवृष्टीला तोंड देणारे तंत्रज्ञान वापरून डांबरीकरण करण्यात येत नसल्याने रस्ते निकृष्ट बनत आहेत असे बोलले जात आहे.

जिल्ह्य़ात हायवेवर आणि राज्यमार्गावर खड्डेच खड्डे बनले आहेत. युती शासन सत्तेवर आल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खड्डेमुक्त सिंधुदुर्गची घोषणा केली होती, पण तेच अधिकारी आणि तेच तेच ठेकेदार रस्त्यांची दुर्दशा करत आहेत हे केसरकर जाणीवपूर्वक विसरले. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील हायवेवर खड्डे पडले ते बुजविण्यासाठी क्रशरचा क्रश टाकण्याचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अबीद नाईक यांनी म्हटले होते तर दुसरीकडे काँग्रेस खड्डय़ात झाडे लावत आहे. वास्तविकता राजकीय शासनाच्या नाकर्तेपणाचा फटका प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना बसू नये म्हणून दक्षता घेण्याची गरज असूनही या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने खारेपाटण ते ओरोसपर्यंतचे खड्डे बुजविण्यासाठी ४० लाख रुपयांचे टेंडर काढून पाऊस कमी होण्याची वाट पाहण्याचे ठरविले आहे. मात्र ओरोस ते बांदापर्यंत रस्ता खड्डेमय ठेवण्याचा बांधकामाचा इरादा आहे असे समजते.